मुंबई : शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळेही उपस्थित आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधातील ईडी कारवाईबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काल संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकासआघाडीमध्ये कुठेतरी समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या उपस्थित घेतलेल्या म्हाडाच्या घरांचा निर्णय रद्द केला होता. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक करण्याचा निर्णय घेतला होता. या वेगवेगळ्या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचं पुढे आलं होतं. त्यानंतर राऊतांनी पवारांची भेट घेतली होती. मतभेद दूर व्हावे यासाठी ही बैठक असल्याची चर्चा आहे.


या भेटीत महाविकासआघाडीत समन्वय आणि मतभेद दूर करण्यासाठी चर्चा होऊ शकते. तसेच अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीवर ही चर्चा होऊ शकते. यावर सरकारची भूमिका काय असावी यावर ही चर्चा होऊ शकते. 


महाविकास आघाडीतल्या नाराजीबाबत संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना जोरदार टोला लगावला. शरद पवारांची भेट ही वैयक्तिक असून महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे अनिल देशमुख ईडी चौकशी प्रकरणी त्यांची बाजू समजून घेणं गरजेचं असून भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका राऊतांनी केली.