दीपक भातुसे, झी मीडिया, रत्नागिरी : मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्य सचिव अजोय मेहता आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजोय मेहतांना पाठिंबा देणारं वक्तव्य केलं आहे. 'या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. एखादा विषय तातडीचा असेल तर, असं होऊ शकतं. मात्र कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळात मंत्र्यांमार्फत यायचे संकेत आहेत, पण मुख्यमंत्रीही आयत्यावेळी तातडीचे विषय आणतात,' असं शरद पवार म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकण दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी मंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये झालेल्या वादावर भाष्यं केलं. 


दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्री आणि सचिव यांच्यामध्ये संघर्ष नाही. बैठकीमध्ये असं काहीही झालं नाही. सूचना येत असतात, काही विषय हे ऐनवेळी येतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 


बैठकीत नेमकं काय झालं?


मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अजोय मेहता यांना घेरलं. रब्बी हंगामातल्या गहू खरेदीचा प्रस्ताव आयत्यावेळी समोर आला. कोणत्याही खात्याचा प्रस्ताव आणताना त्या खात्याच्या मंत्र्यांना तो प्रस्ताव दाखवावा लागतो. मंत्र्याच्या मान्यतेनंतर तो प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येतो. मात्र रब्बी हंगामाचा गहू खरेदी करण्याचा प्रस्ताव परस्पर मंत्रिमंडळ बैठकीत आला. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही या प्रस्तावाची कल्पना नव्हती. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्य सचिवांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. 


सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हा अत्यंत चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचं म्हणलं. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनीही या प्रस्तावावर संबंधित मंत्र्यांची सही नसताना, हा विषय बैठकीसमोर आलाच कसा? असा सवाल केला. मुख्य सचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं. 


याआधीही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी मुख्य सचिवांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. काही मंत्र्यांनी तर नागपूरवरून मुंबईत येऊन मुख्य सचिवांच्या कारभारावरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. यासंबंधात पुढे काहीही न झाल्यामुळे आता मुख्य सचिव विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री हा संघर्ष वाढताना दिसत आहे. 


काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये हा वाद सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणतीही भूमिका घेतली नाही. मुख्यमंत्री या सगळ्या प्रकरणात फक्त ऐकत होते. त्यामुळे मुख्य सचिवांबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ३० जूनरोजी मुख्य सचिवांची मुदत संपत आहे. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुख्य सचिवांबाबत नाराजी आणि मुख्यमंत्र्यांचं मौन यामुळे अजोय मेहतांना मुदतवाढ मिळणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. 


कोरोनाच्या काळात लॉकडाऊनसंदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय होत असताना पालकमंत्र्यांना विश्वासात न घेता परस्पर जिल्हाधिकारी आणि मुख्य सचिव निर्णय घेतात, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या.