मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात दोन निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. तिकडे शरद पवार प्रचाराला गेले नव्हते तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. ते कार्यकर्ते तेव्हा धर्मनिरपेक्ष वाटत होते, आता वाटत नाहीत, असा टोला शरद पवारांनी हाणला आहे. मला साल आठवत नाही पण ईशान्य मुंबईत आम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकर यांच्या पक्षानं नीलम गोऱ्हेंना उभं केलं होतं. त्याचा लाभ प्रमोद महाजन यांना झाला होता. भाजपला मदत पोहोचवण्यासाठी उमेदवार उभं करण्याचं ऐतिहासिक कामगिरी करणारे इतरांना कोण धर्मनिरपेक्ष आहे नाही असं म्हणून चालत नाही, असं वक्तव्य पवार यांनी केलं.


काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. २०१४ निवडणुकीनंतर शिवसेना भाजपला पाठिंबा द्यायला तयार नव्हतं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाण्यात आम्हाला अडचण आहे. भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये आहे. उदयनराजे भोसले भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला होता.


आम्हाला काँग्रेससोबत युती करायची आहे पण त्यांच्या मित्रांबरोबर नाही, असं म्हणत आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आम्ही राष्ट्रवादीसोबत जायला मंजूर नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही याची खात्री त्यांनी काँग्रेसला द्यावी मग आम्ही बघू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


काँग्रेससोबत जाण्याचे संकेत


गेले दीड महिने आम्ही वंचित बहुजन आघाडीचा दौरा राज्यात केला. आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असं आम्ही तेव्हाच म्हणालो होतो, पण काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. आम्ही राज्यात १८ परिषद घ्यायचा निर्णय घेतला तेव्हा एमआयएमकडून परिषदेत सहभागी होण्याचा निरोप आला. राज्यात एमआयएमसोबत आघाडी करण्याचं ठरवलं असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आजही काँग्रेससाठी आमचे दरवाजे मोकळे आहेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही वाट बघू, नाईलाज झाला तर आम्ही निवडणूक लढवू. परिस्थितीनुसार काँग्रेसबरोबर युती केली पाहिजे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.


एमआयएमसोबत जाण्यावर ठाम


एमआयएमसोबत आम्ही युती करणारा आणि निवडणूक लढवणार. आता मागे फिरणार नाही, असं म्हणत एमआयएमसोबतच्या युतीवर ठाम असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.