मुंबई : मराठी व्यक्ती पंतप्रधान व्हावी, हे अवघ्या महाराष्ट्राचं स्वप्न. त्यासाठी सध्यातरी दोनच नावं योग्य दिसत आहेत. एक आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दुसरे अर्थातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. या दोघांच्या नावांची चर्चा अधूनमधून होतच असते. आता पुन्हा हा विषय निघाला तो पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीमुळे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या राजकारणात केलेली कामगिरी पाहूनच २०१४ साली जनतेनं एनडीएला बहुमत दिलं. असंच काहीसं एनडीएला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास घडू शकतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार नाहीत असं मी म्हणत नाही. मात्र चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, मायावती यांना दीर्घकालीन मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यामुळे हे तिघे पंतप्रधानपदासाठी सध्या योग्य पर्याय दिसत आहेत. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असं राहुल गांधींनीच अनेकदा सांगितलंय. त्यामुळे या मुद्द्यावर कोणतीही चर्चा निरर्थक आहे.'


चंद्राबाबू, ममता किंवा मायावती ही तीन नावंच पवारांनी का घेतली याची चर्चा सुरू असताना दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं सांगत विषयाला वेगळं वळण दिलं.


आता तर खुद्द पवारांच्याच राज्याभिषेकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बॅटिंग सुरू केली आहे. एनडीए वगळता इतर पक्षांचे नेते तयार असतील तर पवार पंतप्रधान बनायला तयार असल्याचं माजिद मेमन यांनी म्हटलं आहे.


इंग्रजीत एक म्हण आहे... इफ यू कॅन नॉट कन्व्हिन्स... कन्फ्यूज... तुम्ही समोरच्याला पटवू शकत नसाल, तर गोंधळात पाडा... शरद पवारांचं सगळं राजकारण याभोवती फिरतं, असं मानलं जातं. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे कुणीच सांगू शकत नाही. मात्र भाजप सत्तेपासून दूर राहिल्यास रंगणाऱ्या सत्तानाट्याची चुणूक येथे दिसते आहे.