उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे चार्ज दिला आहे का? भाजपाचा सवाल
`उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखा`
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासू संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. एसटी कामगारांच्या २२ संघटनांच्या प्रतिनिधींनी काल शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावं असं आवाहन एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी केलं.
मात्र या बैठकीबाबत भाजपने प्रश्न उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार शरद पवार यांना दाला का असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. काल एसटी कर्मचारी संघटनांची बैठक शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झाली, मुख्यमंत्री आणि प्रशासनातील अधिकारी नसताना शरद पवार अशी बैठक कशी काय घेऊ शकतात. असा सवालही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तसंच शरद पवार यांना अशा बैठका घ्यायच्या असतील तर मुख्यमंत्री त्यांना चार्ज का देत नाहीत असंही राम कदम यांनी विचारलं आहे.
आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या नियमांचं पालन करा, स्वत:च्या मनमर्जीप्रमाणे संविधान आणि घटनेचा सरकारला अपमान करता येणार नाही, असंही राम कदम यांनी म्हटलं आहे.
गोपीचंद पडळकर यांनी दिला सल्ला
दरम्यान, एसटी आंदोलनावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही परिहवन मंत्री अनिल परब यांना टोला लगावला आहे. स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाही? असा सवाल पडळकर यांनी अनिल परब यांना केला आहे. स्वत: भेटावं आणि ठामपणे त्यांना आश्वासित करावं, की बडतर्फची कारवाई मागे घेता येईल जेणेकर चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, त्यांनी एकजूटीने लढा दिला, महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवारांना तुमच्या विषयाबद्दल खुलेआम चर्चा करण्यास भाग पाडले. आता माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखा आणि आपुलकीने कर्मचाऱ्यांची समजूत काढा, चर्चा करुन तोडगा काढा, असा सल्ला पडळकर यांनी अनिल परब यांना दिला आहे.