मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात शर्मिला ठाकरेंचा सक्रिय सहभाग
मुंबईत मनसेचं राज्यव्यापी अधिवेशन
मुंबई : नेहमीच राज ठाकरेंच्या बरोबरीने मैदानात उतरणाऱ्या राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे राज्यव्यापी अधिवेशनातही तितक्याच उत्साहात सहभागी झाल्या आहेत. आजचा दिवस वेगळा असल्याचं त्या म्हणत आहेत.
'पक्षाला १४ वर्ष झाली आहे. आज पहिलं अधिवेशन होतं आहे याचा आनंद आहे. नवीन झेंड्याचं आज अनावरण आहे. छत्रपतींनी ज्या प्रकारे सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन राज्य केलं. तसं राज साहेब नक्की करतील. हिंदुत्व हे छत्रपतींचं होतं. त्यांच्या सैन्यात सर्व प्रकारचे लोकं होती. तसंच आमचं हिंदुत्व आहे. राज साहेब संध्याकाळी पक्षाची वाटचाल कशी असेल याबद्दल सांगतील.' असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरे यांची लक्षणीय उपस्थिती मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात जाणवते आहे. अमित ठाकरे यांनी मनसेचा झेंडा हाती घेऊन आजपासून खऱ्याअर्थाने आपली राजकीय वाटचाल सुरू केलीये असं म्हणता येईल. मनसेचा नवा झेंडा फडकावत अमित ठाकरेंनी आपला आनंद साजरा केला. अमित उत्साहाने आता पक्षाच्या कार्यासाठी पुढे होताना दिसत आहेत.
मनसेच्या महाअधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय घोषणा करतात तसंच कुठली भूमिका घेतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.