मुंबई : बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सेनेच्या वतीने महापौर बंगल्यावर बैठक होणार आहे. यात बेस्ट कृती समिती सामील होणार नसल्याच बेस्ट वर्कर युनियनचे शशांक राव यांनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही राजकीय बैठकीत सहभागी होणार नाही. प्रत्येक पक्षानं आपली भूमिका समोर ठेवावी. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा किंवा मार्गदर्शन करावे. पण आम्ही कोणाच्याही मंचावर जाणार नसल्याच राव म्हणाले. मोडू पण वाकणार नाही कामगार नेते शशांक राव यांची आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. 


'बेस्ट' कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात कुटुंबीयही सहभागी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. वडाळा आगारात कर्मचाऱ्यांनी याविरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी केली. या आंदोलनात कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी झालेत. आतापर्यंत कुलाबा वसाहतीत राहणाऱ्या २ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आलीय. परळच्या वसाहतीत वास्तव्याला असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोटीस देण्यात येणार आहे. तर ३०० कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाईची नोटीस बजावण्यात आलीय. बेस्ट कामगार सेनेच्या मुलुंड, विक्रोळी, शिवाजीनगर, आणिक, वांद्रे आगारातील काही सभासदांनी सामूहिक राजीनामे दिले.


बेस्टच्या संपाचा तिसरा दिवस


मुंबईत बेस्टच्या संपावर सलग तिसऱ्या दिवशी तोडगा निघालेला नाही. बेस्टची एकही बस रस्त्यावर धावलेली नसल्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. या संपावर तोडगा निघून मुंबईकरांना दिलासा मिळणार का? याकडे लक्ष लागलंय. मुंबईकरांचे हाल होत असताना महापालिका आणि बेस्टवर सत्ता असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी मात्र याबाबत कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची भावना आहे. मात्र संप मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोलमोल उत्तर बेस्टचे अध्यक्ष आशिष चेंबुरकर यांनी दिलंय.