Sheetal Mhatre Video: शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) प्रवक्त्या शीतल म्हात्रेंच्या (Sheetal Mhatre) मॉर्फ व्हिडीओ प्रकरणाचे पडसाद आज विधीमंडळामध्येही उमटले. या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी शिंदे सरकारने विशेष तपास समिती म्हणजेच एसआयटीची स्थापना केली आहे. सरकारने एसआयटी स्थापन केल्याची घोषणा केल्यानंतर शीतल म्हात्रेंनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत त्यांना एक आवाहन केलं आहे.


एसआयटीबद्दल काय म्हणाल्या शितल म्हात्रे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओसंदर्भात एसआयटी नेमली आहे. कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात एसआयटी स्थापनेची घोषणा केली. या एसआयटी स्थापनेवर तुम्ही समाधानी आहात का? असा प्रश्न एसआयटी स्थापनेनंतर शीतल म्हात्रेंना 'झी 24 तास'बरोबर केलेल्या विशेष चर्चेदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शीतल म्हात्रेंनी, "नक्कीच मी समाधानी आहे कारण महिलांसंदर्भातील या अडचणींना या विधीमंडळाने चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला आहे," असं म्हणत एसआयटी स्थापन करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.


उद्धव ठाकरेंना टोला


तसेच पुढे बोलताना शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंसंदर्भात बोलताना टोला लगावला. "एक काळ असा होता जेव्हा घोसाळकरांच्या वेळेस एक प्रकरण घडलं होतं. तेव्हा मी, मनिषाताई आणि शुभाताई आम्ही गयावया करत होतो उद्धवजींना की आमचं ऐकून घ्या. पण त्यांनी ऐकूनही घेतलं नाही. हाच फरक आहे दोन पक्षांमधला जेव्हा स्वत: शिंदेसाहेब असतील, फडणवीससाहेब असतील. मनिषाताई, यामिनीताई असतील. मनिषा कायंदे असतील, चित्रा वाघ असतील अगदी अजित पवारसुद्धा या सर्वांनी पाठिंबा दिला एसआयटी चौकशीसाठी. या चौकशीमधून नक्कीच सत्य समोर येईल," असा विश्वास शीतल म्हात्रेंनी व्यक्त केला.


नक्की वाचा >> संजय राऊतांची प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; म्हणाले, "...तर अश्लीलता पसरवणाऱ्यांवर..."


थेट रश्मी ठाकरेंचा केला उल्लेख


तसेच पुढे बोलताना शीतल म्हात्रेंनी थेट रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत त्यांना एक आवाहन केलं. "माँ साहेबांनी आम्हाला सन्मान दिला त्या पक्षात अशा गोष्टी घडत आहेत. रश्मी वहिनी कदाचित तुमचं लोक ऐकत असतील तर यांना समजवा की अशापद्धतीने एखाद्या महिलेला टार्गेट करुन तिला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करु नका. ती कुणाच्या तरी घरातील बहिणी आहे, सून आहे, आई आहे, बायको आहे. नका तिला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करु," असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. 


पाच जणांना अटक


दरम्यान, या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरुन शीतल म्हात्रेंनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे. ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या साईनाथ दुर्गेला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. या अटकेवरुन या गोष्टी कोणत्या थराला गेल्यात हे दिसत आहे, असा टोला शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.