Sheetal Mhatre Video प्रकरणावर 4 दिवसांनी प्रकाश सुर्वेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, `ज्याने कुणी हा व्हिडीओ...`
Sheetal Mhatre Prakash Surve Video Issue: शनिवारी म्हणजेच 11 मार्च रोजी हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर 4 दिवसांनी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी या प्रकरणासंदर्भात भाष्य केलं आहे. त्यांनी एक पत्र जारी करुन यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Prakash Surve On Sheetal Mhatre Video: शिवसेनेच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या मॉर्फ व्हिडीओ प्रकरणामध्ये (Sheetal Mhatre Video) शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी 4 दिवसांनंतर आपली पहिला प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रसारमाध्यमांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये सुर्वे यांनी घडलेल्या प्रकरणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'श्रीकृष्ण नगर पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमा दरम्यान काढलेल्या रेली बाबत विरोधकांनी पसरविलेल्या खोटया व्हिडीओ आणि अपप्रचाराबाबत' या विषयाच्या मथळ्यासहीत हे पत्र प्रकाश सुर्वेंनी जारी केलं आहे. प्रकाश सुर्वेंनी या पत्रात काय म्हटलं आहे पाहूयात...
अनेक कामं करुन घेतली...
"मी गेल्या महिन्याच्या 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव वोकार्ड इस्पीतळामध्ये दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने व सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होत आहे. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असे चूकीचे अर्थ काढून अपप्रचार केल्या जात असल्याने मी हे विस्तृत निवेदन देत आहे. दिनांक 11 मार्च 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून केवळ 10 महिन्याच्या आत माझ्या मागाठाणे विधानसभा मतदार संघामधील विविध प्रश्न आणि समस्या समजून घेत त्यावर प्रशासकिय अधिका-यांसोबत बैठका घेत सर्व प्रश्नांवर तोडगा काढत विविध विकासकामांना मंजुरी देत ती स्वतः जातीने लक्ष देत पूर्ण करुन घेतलेली आहेत. यामध्ये श्रीकृष्ण नगर येथील जुना पुल तोडून तेथे नवीन पूल बांधणी वेगाने करून घेतली," असं प्रकाश सुर्वेंनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांचे आभार मानन्यासाठी गर्दी
"माझ्या मतदारसंघातील श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, काजुपाडा, चौगुले नगर, अशोकनगर, नॅन्सी कॉलनी, महिंद्रा कॉलनी व इतर विभागातील हजारो नागरिकांना या पूलाचा फायदा होणार आहे. या सोबतच मुख्यमंत्री शिंदे यांनी 30 कोटी रुपये मंजुर करून एम.एम.आर.डी.ए अंर्तगत मुंबई मधील प्रथम एक्सीलेटर (सरकता जीना) असलेला स्कायवॉक मंजुर केला. हा स्कायवॉक समतानगर ते पोईसर मेट्रो स्टेशनपर्यंत आहे. याचा फायदा समतानगर, सिध्दार्थनगर, ठाकुर कॉम्पलेक्स, वैभव नगर, जानुपाडा व इतर विभागातील हजारों नागरिकांना दररोजच्या प्रवासासाठी होणार आहे. या दोन मोठया प्रकल्पापैकी एकाच लोकार्पण आणि एकाच भूमीपुजन मुख्यमंत्री शिंदेंनी दिनांक 11 मार्च 2023 रोजी केलं. यावेळी हजारो नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानण्याकरिता मोठ्या संख्येने गर्दी करून हजेरी लावली आणि त्यांच्या कामाप्रती आभार व्यक्त केले," असंही सुर्वेंनी म्हटलं आहे.
कामाच्या जोरावर निवडून आलो
"माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात मी कायम सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे या करिता जीवापाड मेहनत करुन लोकप्रतीनिधी म्हणून प्रशासनासोबत कामांचा पाठपुरवठा करून ती पुर्ण करून लोकसेवेत देणे हे माझे कर्तव्य मानले आहे. या कामाच्या जोरावरच आणि जनतेच्या प्रेमामुळेच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले आहे," असंही सुर्वेंनी म्हटलं आहे.
अशा विकृत गोष्टी करत
"सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदार संघात जोमाने सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या धडाक्यामुळे स्वतःच्या राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रकल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीओ मॉर्फ करणे. खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. यामधून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते, सर्वसामान्य लोकांना मात्र त्यांच्यासाठी 24 तास लोकांमध्ये राहून काम करणारे लोकप्रतिनीधी आवडतात आणि लोक त्यांच्यामागे उभे राहतात हा माझा अनुभव आहे," असं सुर्वेंनी या मॉर्फ व्हिडीओ प्रकरणाबद्दल म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये चुकीचे गाणे घालून...
"दिनांक 11 मार्च 2023 रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हजारो लोकांच्या गर्दीच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांची रॅली झाली यावेळी प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणी समान असणा-या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीओमध्ये चुकीचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडीओ सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला. अशाप्रकारचे कृत्य हे हा व्हिडीओ बनविणायांची महिलांच्या प्रति असलेली ही मानसिकता दाखवून देते," असं सुर्वेंनी म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख
"छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला दिली आहे हीच शिकवण स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही हिच शिकवण अंगीकारली आहे," असंही सुर्वेंनी म्हटलं आहे.
अशी अपेक्षा करतो की...
"या बनावट व्हिडीओ प्रकरणात मुंबई पोलीसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्राबाबत संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे तपासातून याबाबतचे सत्य सामोरे येईलच अशाप्रकारचे व्हिडीओ पसरवून लोकांचे लक्ष विचलीत करता येईल मात्र लोकांचे मन जिंकण्याकरिता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करीत रहावी लागतात. विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील अशी मी अपेक्षा करतो," असंही सुर्वेंनी म्हटलं आहे.
ज्या कुणी हा व्हिडीओ बनविला असेल त्यांना..
"या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. ज्या कुणी हा व्हिडीओ बनविला असेल त्यांना परमेश्वर सदबुद्धी देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना," असंही सुर्वेंनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.