मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट इथं शिंदे गटाच्या आमदारांची बैठकी सुरु आहे. या बैठकीत शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र शिंदे गटाने हात लावलेला नाही.


दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम (Ramdas Kadam) आणि आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांची निवड केल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही वेळेपूर्वीच पक्ष विरोधी कारवाया केल्याने रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर लगेचच शिंदे गटाने या दोघांना नेतेपद दिलं आहे. 


याशिवाय  उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


बैठकीला शिवसेना खासदारांची उपस्थित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे आमदारांची बैठकी सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार (Shivsena MP) हे थेट दिल्लीतून ऑनलाईन सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती पुढे आली आहे.


अरविंद सावंत, विनायक राऊत, गजानन किर्तीकर आणि ओमराजे निंबाळकर वगळता इतर 14 खासदार या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे.