शिंदे गटाचा आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का, बालेकिल्ल्यातच शिवसेनेत फूट
गणशोत्सात राज्यात राजकीय घडामोडींना वेग, आदित्य ठाकरे यांना धक्का
मुंबई : शिंदे गट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. वरळी (Worli) हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला मानला जातो. पण या बालेकिल्ल्यातच शिंदे गटाने आता धडक मारली आहे. वरळीतल्या अनेक सेना पदाधिकाऱ्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली.
वरळीतल्या सेना पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक पार पडली असून लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
'शिंदे गट-भाजपाचा केविलवाणा प्रयत्न'
शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. एकनाथ शिंदे यांची घेतलेल्यांपैकी एकही पदाधिकारी नाही. त्यामुळे मोठा धक्का बसलाय असं काही घडलेलं नाही असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. या गोष्टीला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलंय.
गेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) वरळीत स्वबळावर निवडणुक लढवली. पण त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. भाजपचे सर्व उमेदावर तिसऱ्या क्रमांकावर होते, तोच केविलवाणा प्रयत्न आता पुन्हा होतोय, त्यामुळे मोठा फरक पडेल असं वाटत नसल्याचं सचिन आहिर यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची एन्ट्री
वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा हक्काचा गड मानला जातो. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याकडे या मतदारसंघाच्या प्रतिनिधीत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. पण, त्यांच्याच मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ग्रँड एन्ट्री घेतली आहे. ठाकरेंच्या हक्काच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स झळकले आहेत.
वरळीचा लाडका मार्केटचा राजा इथं श्री विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वागत कमानीवर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे पोस्टर लावण्यात आले आहेत. कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचेही फोटो आहेत.