ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट: दसरा मेळाव्यात `आवाज कुणाचा`, शक्तीप्रदर्शनासाठी कोट्यवधींचा खर्च
Dasara Melava : शिवसेनेचे यंदा 2 दसरा मेळावा मुंबईत होत आहे. यासाठी लाखो लोकं मुंबईत दाखल होणार आहेत.
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता दसरा मेळाव्यात (Dasara Melava) दोन्ही गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाने (Shinde vs Thackeray) अभूतपूर्व असं नियोजन केलंय. लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी कोट्यवधींचा खर्च केलाय. १० हजारांहून अधिक एसटी बसेस, खासगी बसेस, गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले जात आहेत. मुंबईत दस-याला सुट्टी असल्याने इतर वाहनांची संख्या कमी असेल असं गृहीत धरून लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईत आणण्याचं नियोजन आहे. एवढी मोठी गर्दी आवरण्याचं आणि त्याचवेळी कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. (shivsena Dasara melava)
शिवाजी पार्कवर (Shivaji park) दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गट (Thackeray Group) सज्ज झालाय. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी काही लाख कार्यकर्ते जमवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईतून किमान ५० हजार तर मुंबईबाहेरून ५० हजार कार्यकर्ते जमवण्याची रणनीती आखण्यात आलीये. ज्याची गर्दी जास्त त्याची शिवसेना असा प्रचार केला जातोय. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटात गर्दीची शर्यत सुरू झालीय.
मुंबईतून प्रत्येक शाखेतून ४ बसेस निघणार आहेत. मुंबई एकूण २२७ शाखा आहे म्हणजे एकूण ९०८ बसेस या मुंबईतल्याच असणार आहे. मुंबईतून ठाकरेंना यंदा ५० हजारांपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आणि नाशिकमधून मोठी गर्दी अपेक्षित आहे.
मुंबईच्या बाहेरून साधारणतः ५० हजार कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ट्रेननं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येणार आहेत. किशोरी पेडणेकर, अरविंद सावंत, नितिन बानुगडे पाटील, आदित्य ठाकरे यांची भाषण आधी होतील, अशी माहिती आहे. तसेच काही नवीन चेहऱ्यांना भाषणं करण्याची संधी मिळू शकते. उद्धव ठाकरे साडेसात वाजता भाषणाला उभे राहतील अशी शक्यता आहे.