शिवसैनिक आक्रमक! बंडखोर आमदार दिलीप लांडे, मंगेश कुडाळरांविरोधात घोषणाबाजी, बॅनर फाडले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांना भावनिक साद, बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक
Shivsena vs Eknath Shinde : शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असा संघर्ष टोकाला पोहचला आहे. आपला गट हीच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 42 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे.
तर उद्धव ठाकरे यांनी थेट शिवसैनिकांच साद घातली आहे. जे गेले त्यांचा विचार करु नका, ताकदीनं लढा, असा कानमंत्र मुंबईतील विभागप्रमुखांना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला मुक्काम वर्षावरुन पुन्हा मातोश्रीवर हलवल्यानंतर शिवसैनीक मोठ्याप्रमाणावर मातोश्रीवर येत आहेत.
शिवसेनेची खरी ताकद असणारा सामान्य शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. शिवसेना आमदार दिलीप लांडे हे शिंदे गटात गेल्यानं शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. चांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी आमदार दिलीप लांडे यांचे बॅनर्स फाडले. माजी नगरसेवक सोमनाथ सांगळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी साकीनाका चौकात लागलेले दिलीप लांडे यांचे बॅनर्स फाडले.
तर कुर्ला विधानसभा शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन मिळाल्याने त्यांच्याविरोधातही शिवसैनिकांमध्ये संताप आहे. चुनाभट्टीमध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन कुडाळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच त्यांचे बॅनरही फाडण्यात आले.
आम्ही कट्टर शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे पाईक आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.