राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं भजन-किर्तन, `मातोश्री`च्या बाहेर जागता पहारा
हनुमान चालिसा म्हटल्यावर प्रसाद देण्याची परंपरा आहे, शिवसैनिकांचा इशारा
मुंबई : राणा दाम्पत्यानं 'मातोश्री'वर येण्याचा इशारा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले आहेत. या सर्व शिवसैनिकांना मुख्यमत्र्यांनी घरी जाण्याचं आवाहन केलं. मात्र शिवसैनिकांनी घरी जाण्यास नकार दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी मातोश्री निवासस्थानी आले त्यानंतर संध्याकाळी मातोश्रीवरून पुन्हा वर्षा निवासस्थानी रवाना झाले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
'मातोश्री'बाहेर जागता पहारा
राणा दाम्पत्य सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसैनिक कलानगरच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसले आहेत. रात्रभर जागता पहारा देणार असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. या सर्व राड्याच्या पार्श्वभूमीवर मातोश्री परिसरात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. हनुमान चालिसा म्हटल्यावर प्रसाद देण्याची परंपरा आहे, शिवसैनिक त्यांना प्रसाद देतील, असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिलाय.
राणा दाम्पत्याच्या घराबाहेर भजन-कीर्तन
दुसरीकडे, राणा दाम्पत्याच्या खार इथल्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार 'फिल्डिंग' लावली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील खारच्या घराबाहेर शिवसैनिक रात्रभर खडा पहारा देणार आहेत. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू न देण्याची व्यूहरचना शिवसैनिकांनी आखली आहे. आतापासूनच शिवसैनिक तिथं जमले असून त्यांनी भजन-कीर्तन सुरू केलं आहे.
राणा दाम्पत्याला पोलीस ताब्यात घेणार
दरम्यान, रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याला खारमधल्या घरीच ताब्यात घेतलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी दुपारीत राणा दाम्पत्याच्या घरी जाऊन त्यांना नोटीसही बजावली त्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्या मातोश्रीवर धडक देणारच असा निर्धार राणा दाम्पत्यानं केलाय.