सत्तासंघर्षात आता आमदारांची फोडाफोडी होणार?
सत्तास्थापनेचा कोणताच पर्याय पुढे येत नसल्यानं आता आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती काही पक्षांना वाटू लागलीय.
मुंबई : सत्तास्थापनेचा कोणताच पर्याय पुढे येत नसल्यानं आता आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती काही पक्षांना वाटू लागलीय. त्यामुळे आमदार सुरक्षित ठेवण्यापासून ते, आमदार फुटले तर निवडणुकीत त्यांना सर्वपक्षीय विरोध करण्यापर्यंत नवे डावपेच आतापासूनच लढवले जातायत.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांचा हा सध्याचा पत्ता. मुंबईत वांद्र्यात म्हणजे मातोश्रीपासून जवळच असलेल्या रंगशारदा हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम आता असणार आहे. गुरुवारी मातोश्रीवरची बैठक आटोपली आणि सगळ्या आमदारांची रवानगी रंगशारदामध्ये करण्यात आली.
शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता भाजपा देवेंद्र फडणवीसांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यावर ठाम असल्यानं त्यांना आवश्यक असलेले २५ आमदार कुठून जमवणार याची चर्चा सुरु झालीय.
भाजपा कर्नाटकप्रमाणे ऑपरेशन कमळ राबवून आमदारांची फोडाफोडी करेल अशी कोणतीही बातमी समोर आली नसली तरी २५ वर्षांची दोस्ती असलेल्या शिवसेनेलाही आता मित्रावर विश्वास राहिला नसल्याचं दिसतंय. त्यामुळेच आपल्या आमदारांना त्यांनी रंगशारदामध्ये ठेवलं असावं.
सत्तासंघर्षात साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर होण्याची भीती आता शिवसेनेला वाटू लागली असावी. पण संजय राऊत यांनी मात्र वेगळाच तर्क मांडून आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्याच्या कृतीचं समर्थन केलं.
भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनाच सावध झाल्यानंतर विरोधी आघाडीतील नेत्यांनीही आपल्या आमदारांना दम दिलाय. यापुढे आमदार फुटलेच तर सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांना पराभूत करतील असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाहीर केलंय. पण राजकारणात बेसावध राहून चालत नाही. त्यामुळे शिवसेनेनं तरी आतापासूनच सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे.