कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघेही युती होणार असल्याचे ठामपणे सांगत असले तरी प्रत्यक्ष युतीमधील जागावाटपाचे घोडं पुढं सरकताना दिसत नाही आहे. कुणी किती जागा लढवायच्या यावरून मतभेद असल्यानंच गेला आठवडाभर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात थेट बैठकच झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा विविध प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. जागावाटपाचे विविध फॉर्म्युले समोर येत असले तरी त्यावर अंतिम तोडगा निघताना दिसत नाही. भाजपानं अपेक्षापेक्षा खूपच कमी जागा शिवसेनेला देऊ केल्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरलीय. यामुळंच की काय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही उद्विग्नता दर्शवली.


कशावरून अडलंय युतीच्या जागावाटपाचं घोडं?


भाजपा ज्याप्रमाणे सर्व जागा लढवण्याची तयारी करत आहे तशीच शिवसेनेकडूनही सुरु आहे. सर्व २८८ जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्याचे उद्धव ठाकरे ठाकरे यांनीही मान्य केलंय. तरीही मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा ठामपणे युती होणार असल्याचं सांगितलंय.  


असं असलं तरी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उकरून काढलाय. विशेष म्हणजे त्याला आता आरेचीही जोड मिळालीय. नाणार जे झालं तेच आरेचंही होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 


आरेवरून युती तुटणार तर नाही ना?


तर मुख्यमंत्र्यांनीही आरे कॉलनीतच मेट्रोचं कार शेड उभारण्याचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. नाणाच्यावेळी लोकसभा तोंडावर होती. त्यामुळे भाजपानं माघार घेतली. मात्र लोकसभेतलं घवघवीत यशामुळे राज्यातल्या भाजपाचा आत्मविश्वास दुणावलाय. त्यामुळे युती तोडण्यासाठी आरेचा मुद्दा तर कारणीभूत ठरणार नाही ना? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.