मुंबई: शिवसेनेकडून येत्या १७ तारखेला मुंबईत पीकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ झाला आहे. शेतकऱ्यांना नाडणाऱ्या या कंपन्यांविरोधात शिवसेना येत्या १७ तारखेला मोर्चा काढेल. वांद्रे-कुर्ला संकुलातील भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीवर हा मोर्चा काढण्यात येईल. हा मोर्चा म्हणजे राज्यभरातील पीक विमा कंपन्यांसाठी इशारा असेल. उद्धव ठाकरे या मोर्च्याचे नेतृत्त्व करतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर पीक विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. सरकारकडून शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सरकारकडून विमा कंपन्यांना तसे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, यानंतरही काही विमा कंपन्या ऐकायला तयार नाहीत. त्यांना शिवसेनेच्या भाषेत समजावले जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 




उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील मेळाव्यातही विमा कंपन्यांवर टीकास्त्र सोडले होते. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडेल, असा इशारा उद्धव यांनी दिला होता.