मुंबई : दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना एनडीएला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत या संपादकीय लेखातून देण्यात आलेत.याआधी स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेन घेतला होता, आता एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत देत शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकलयं.


सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे - 


- शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. आता आंध्रच्या चंद्राबाबूंनीही तोच अनुभव कथन केला. चंद्राबाबू हे तर पंतप्रधान मोदींचे प्रिय पात्रच होते, पण चंद्राबाबूंनीही ‘लव्ह जिहाद’ मोडून स्वाभिमानाचा जिहाद पुकारला आहे. २०१९ च्या राजकारणास नवे वळण देणारे हे असे सुरुंग फुटत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही एका चांगल्या विचाराने बांधलेली मोट होती. ती टिकावी व काँग्रेसला आजन्म पर्याय उभा करावा ही आमची भूमिका होतीच. अत्यंत संकटकाळातही ‘रालोआ’ टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेने शर्थ केली, पण आता भाजपने ३८० ते ४०० खासदारांचे ‘टार्गेट’ स्वबळावर ठेवल्याने त्यांना शुभेच्छा देण्याशिवाय आमच्या हाती दुसरे काय आहे?


- चंद्राबाबू नायडू यांचा शिवसेनेशी संबंध नाही. कधी कुठे भेटले तर ‘नमस्कार चमत्कार’ होतात इतकेच, पण चंद्राबाबूंनीही आता भारतीय जनता पक्षावर तोफ डागली असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा केली आहे. हा त्यांचा संताप आणि उद्रेक आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात शिवसेनेबाबत जी कूटनीती अवलंबली आहे तीच आंध्रात तेलुगू देसमच्या बाबतीत अवलंबली आहे. भाजप युतीधर्माचे पालन करीत नाही, उलट मित्रपक्षांना खच्ची करण्यातच त्यांना आनंद मिळतो असे तेलुगू देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू यांनी स्पष्ट केले आहे. राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी युती करायची, सत्ता मिळवायची आणि नंतर हळूहळू मित्रपक्षालाच खच्ची करून हातपाय पसरायचे ही भाजपची ‘मोडस् ऑपरेंडी’ असल्याचे तेलुगू देसमचे म्हणणे आहे. 


- अर्थात महाराष्ट्रात त्यांची ही ‘मोडस् ऑपरेंडी’ की काय ती शिवसेनेने चालू दिलेली नाही व सर्व कटकारस्थानांचा फडशा पाडत महाराष्ट्राच्या राजकारणात स्वाभिमानाचा भगवा झेंडा फडकत ठेवला आहे. महाराष्ट्रातील ‘हवाबाज’ भाजप नेत्यांचे म्हणणे असे आहे, २०१४ साली मोदी लाटेमुळे शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. म्हणजे त्यांना असे म्हणायचे आहे काय, महाराष्ट्रात किंवा देशात मोदी लाट की काय नव्हती तेव्हा शिवसेना कुठेच नव्हती व फक्त भाजपचीच चणे, कुरमुऱ्यांची दुकाने सुरू होती. हे त्यांचे अज्ञान आहे व त्यांनी नव्याने अभ्यास करून बोलायला हवे. मोदी लाट नव्हती तेव्हाही दिल्लीत शिवसेनेचे वाघ निवडून जातच होते. 


- उलट महाराष्ट्रात शिवसेना होती म्हणूनच भाजपास आजचे ‘अच्छे’ दिवस दिसत आहेत. २०१४ च्या मोदी लाटेचे ठेवा बाजूला, आता २०१९ चे घोडामैदान लांब नाही. तेव्हा शिवसेनेशिवाय किती खासदार तुमच्या बळावर निवडून येतात ते पाहू. म्हणजे शिवसेना काय व कोण आहे त्याचे विराट दर्शन या ‘लाट’करांना होईल. बिल्डर व ठेकेदारीच्या पैशांतून सध्या जे राजकारण तरारले आहे ते टिकणारे नाही हे लक्षात घ्या. लाटेत निवडून आलेले आमदार, खासदार उद्या होत्याचे नव्हते होतील व महाराष्ट्रात फक्त शंभर नंबरी भगव्याचेच खासदार, आमदार सोन्याप्रमाणे चकाकतील. त्यामुळे युती नसेल तर शिवसेनेचेच नुकसान होईल व आमचेच हात आभाळास टेकतील या भाकडकथांना आता काही अर्थ नाही. या थापा आहेत व दावोस येथे मोदी यांनी जी भयंकर थाप मारून जगास हसवून (किंवा हादरवून) सोडले तसेच हे आहे. 


- हिंदुस्थानातील ६०० कोटी जनतेने भारतीय जनता पक्षाला मतदान करून सत्तेवर आणले असे मोदी जागतिक व्यासपीठावर बोलले. तसेच हे, म्हणजे भाजप नसेल तर शिवसेनेचे नुकसान होईल असे सांगण्यासारखे आहे. मित्रवर्यांनी आमच्या फायद्यातोटय़ाची चिंता करू नये. तुमचे ६०० कोटी मतदार सांभाळा. कारण हिंदुस्थानची लोकसंख्या १२५ कोटी आहे. त्यामुळे उरलेले पावणेचारशे कोटी मतदार हे चंद्रावर किंवा मंगळावर आहेत व ते भाजपलाच मतदान करतात असा दावा असल्याने तिथेही आता पोहोचावे लागेल. कारण देशाच्या राजकारणात त्यांना


- ‘युती’साठी चांगले मित्र मिळणार नाहीत. त्यामुळे परग्रहावरचेच मित्र शोधावे लागतील. शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्याच कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. आता आंध्रच्या चंद्राबाबूंनीही तोच अनुभव कथन केला. ‘माझे ते माझेच, पण तुझे तेही माझ्या बापाचे’ ही वखवख मित्रधर्माचा घात करते. आज शिवसेना, तेलुगू देसमने परखडपणे भूमिका मांडल्या. अकाली दलातही अस्वस्थताच आहे. जेव्हा कुणीच बोलायला तयार नव्हते तेव्हा शिवसेनेने भाजपच्या प्रवृत्तीवर आवाज उठवला. सत्तेत राहून शिवसेना हे असे का वागते? असा सवाल करणाऱ्यांना आता चंद्राबाबूंनीच उत्तर दिले. शिवसेनेप्रमाणेच तेलुगू देसमही केंद्रात सत्तेत आहेच. 


- राज्यात चंद्राबाबूंना भाजपचा टेकू आहे. त्यामुळे ‘‘चंद्राबाबू सत्तेतून बाहेर पडा व बोला’’ असे फुसके ठोसे अद्यापि कुणी का लगावलेले नाहीत? चंद्राबाबू हे तर पंतप्रधान मोदींचे प्रिय पात्रच होते, पण चंद्राबाबूंनीही ‘लव्ह जिहाद’ मोडून स्वाभिमानाचा जिहाद पुकारला आहे. २०१९ च्या राजकारणास नवे वळण देणारे हे असे सुरुंग फुटत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही एका चांगल्या विचाराने बांधलेली मोट होती. ती टिकावी व काँग्रेसला आजन्म पर्याय उभा करावा ही आमची भूमिका होतीच. अत्यंत संकटकाळातही ‘रालोआ’ टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेने शर्थ केली, पण आता भाजपने ३८० ते ४०० खासदारांचे ‘टार्गेट’ स्वबळावर ठेवल्याने त्यांना शुभेच्छा देण्याशिवाय आमच्या हाती दुसरे काय आहे?