मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सरकार आले तर १० रुपयांत सर्वसामान्यांना थाळी देण्याचे आश्वासन दिले होते. ही थाळी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या उपाहारगृहात १० रुपयांची जेवणाची थाळी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळीची घोषणा केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही घोषणा प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महागाई लक्षात घेता दहा रुपयांच्या थाळीसाठी प्रत्यक्षात जवळपास ५० रुपयांचा खर्च येणार आहे. उर्वरित ४० रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचा मुद्दा या प्रस्तावात असल्याचे समजते आहे. या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासून तो लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणारे आहे. 


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारच्या १० रुपयांच्या थाळीची प्रतीक्षा असताना शिवसेनेने माऊली थाळी सुरू केली आहे. मुलुंडचे शिवसैनिक जगदीश शेट्टी यांनी रयत माऊली अन्न रथाच्या माध्यमातून दहा रुपयात थाळी उपलब्ध करून दिली आहे. यात वरण भात, चपाती भाजी असं या थाळीचं स्वरुप आहे. येत्या काळात राज्यात सगळीकडं १० रुपयांची शिवथाळी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. १० रुपयातली शिवथाळी लोकप्रिय होईल यात वाद नाही. पण ही शिवथाळी झुणकाभाकरच्या मार्गाने जाऊ नये अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.