मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप यांची युती होणार की नाही, याची जोरदार उत्सुकता आहे. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. त्याआधी गोरगाव येथे अमित शाह व्याख्यानानिमित्त आले होते. मात्र, ते मातोश्रीवर जातील आणि युतीबाबत बोलणी करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही. तर दुसरीकडे ते २६ रोजी मुंबईत आल्यानंतर युतीची बोलणी पुढे सरकतील असे सांगितले जात होते. परंतु त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे युतीचे काही खरे नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह मुंबई दौऱ्यात शहा युतीची घोषणा करण्याची शक्यता अधिक होती. मात्र युतीच्या चर्चेचे घोडे जागा वाटपावर अडल्याने शाह यांनी हा दौरा रद्द केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शाह यांनी दौरा रद्द केल्याने शिवसेना-भाजपाची युती होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. गोरेगाव येथे दोन दिवसापूर्वी एका व्याख्यानात बोलताना भाजपला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन करताना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे जाहीर केले होते. या भाषणात त्यांनी शिवसेनेचा उल्लेखही केला नव्हता. तसेच युतीवरही भाष्य करण्याचे टाळले होते.


दरम्यान, भाजपने ११० जागांचा दिलेला प्रस्ताव शिवसेनेने नाकारल्याने युती होण्याची शक्यता कमी आहे. तसेच १० जागांवर अदलाबदल कण्याबाबत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे युतीची शक्यता अधिक धुसर बनली आहे. दरम्यान, २६ सप्टेंबरपर्यंत युतीवर तोडगा निघणार असल्याची शक्यता होती. त्यामुळे हा मुंबई दौरा निश्चित झाला होता. या दौऱ्यात शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करण्याची रणनीती भाजपने आखली होती. मात्र युतीच्या जागा वाटपाचं घोडे अडल्याने दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे.


काही राजकीय निरीक्षकांच्या मते २८ सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपत असल्याने ३ ऑक्टोबर रोजी अर्थात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या एक दिवस आधी युतीची घोषणा करण्यात येणार येईल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेनेही २८८ जागांवर उमेदवार देण्यासाठी तयारी सुरू केल्याने ही चर्चा युतीची शक्यता मावळल्याचे बोलले जात आहे.