मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीची घोषणा १९ सप्टेंबरला होण्याची शक्यता असल्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. १९ सप्टेंबरला नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित राहणार आहेत. यावेळी युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे लाड यांच्यांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान शिवसेनेने २८८ मतदारसंघांसाठी चाचपणी सुरू केली आहे. मातोश्रीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक सुरू आहे. युतीच्या ५०-५० टक्के फॉर्म्युलाबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शिवसेनेच्या जागांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करणार आहेत. नंतर ही यादी घेऊन मी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना दाखवून जागांचे ठरवू, असे सांगत युतीच्या जागावाटप तिढ्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. दरम्यान, शिवसेना १३५-१३५ च्या फॉर्म्युलावर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. तर भाजप शिवसेनेला ११० ते ११६ जागा देण्यास राजी आहे. त्यामुळे युती होणार की नाही, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, शिवसेना निम्या-निम्या जागावर अजूनही ठाम असल्याचे बोलले जात आहे.


तर शिवसेनेने २८८ जागांवर मुलाखती घेतल्याचे आपल्याला माहिती नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीलाच पुन्हा यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महायुतीच सत्ता मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच महायुतीचे जागावाटप लवकरच जाहीर केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.