हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल- उद्धव ठाकरे
मोदींनी हिंदुत्व राजकारणातून टाळता येणार नाही हे दाखवून दिले
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील प्रचारसभेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून केलेल्या प्रचाराला शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल, अशी भूमिका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मांडण्यात आलीय. २०१४ सालीही मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला व २०१९ सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल. पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा पुकार केला व हिंदुत्व राजकारणातून टाळता येणार नाही हे दाखवून दिले, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
देश फक्त मोदींच्या हातातच सुरक्षित राहू शकतो - अमित शहा
याशिवाय, मोदींच्या सभेला कमी गर्दी झाल्याची टीका करणाऱ्या विरोधकांनाही शिवसेनेने फटकारले आहे. २०१९ च्या रणांगणात हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले. मोदी यांच्या सेवाग्राममधील सभेस गर्दी कमी होती व सभेचे मैदान चाळीस टक्के रिकामे होते, अशी काव काव काहींनी केली. पण वर्ध्यातील उष्णतेचा चढलेला पारा पाहता त्या तप्त ज्वाळांतही मैदान साठ टक्के गच्च भरले हे महत्त्वाचे आहे. म्हणजे विरोधकांनी ‘गर्दी’चे कारण देत अपशकून करण्याचा प्रयत्न केला, पण ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे या वादासारखाच हा विषय आहे. मैदान चाळीस टक्के रिकामे नव्हते, तर साठ टक्के भरले याचे दुःख विरोधकांना झाले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
आमचा नेता ठरलाय, तुमच्याकडे कोण आहे; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना सवाल