मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर येथील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. ‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


'मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हा महाराष्ट्राचाच अपमान आहे'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनात 'मुंबई कुणाची!' या मथळ्याखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहीला आहे. या लेखात ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावर टीका केली आहे. 'मुंबईचा विकास म्हणजे बिल्डर व धनिकांचे राज्य आणि त्याच पैशांतून शेठजींच्या पक्षांचे राजकारण, असा एकंदर प्रकार सुरू आहे. मुंबईचा विकास जर एवढ्यापुरताच मर्यादित असेल तर मुख्यमंत्र्यांचे विधान योग्य व भाजपसारख्या पक्षाचा खरा चेहरा दाखविणारे आहे. येथील गिरण्यांच्या जमिनीवर आता मराठी माणसांची थडगी उभी राहिलेली दिसतात. त्या थडग्यांवर उपऱ्या धनदांडग्यांनी श्रीमंती मॉल्स व टॉवर्स उभे केले. त्या टॉवर्सकडे बघून मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हा महाराष्ट्राचाच अपमान आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. तर, ‘वाल्यां’च्या आगमनामुळे भाजपचा विकास झाला, भाजप संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे, असा सल्लाही ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.


शिवसेनेच्या पहाऱ्यामुळे मुंबईची कोंबडी जिवंत..


फडणवीस यांच्या विधानाचे समर्थन करता येणार नाही. मुंबई घडविणाऱ्या, रक्षणाऱ्या श्रमिकांच्या बाजूने फडणवीस बोलले नाहीत, तर ते श्रमिकांचे शोषण व लूट करणाऱयांच्या समर्थनार्थ बोलले आहेत. मुंबई संपन्न आणि वैभवशाली होती म्हणून इतर प्रांतांतले लोक पोटापाण्यासाठी मुंबईत आले व संपन्न झाले. मुंबई ही आधीपासूनच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती. म्हणूनच तिला दाणे टाकण्यासाठी लाखो लोक मुंबईत आले, पण यापैकी अनेकांनी कोंबडीच मारून खाण्याचा प्रयत्न केला. गेल्या ५५ वर्षांपासून शिवसेना येथे पहारेकऱ्याच्या भूमिकेत असल्यानेच कोंबडी जिवंत आहे.


मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्कच नाकारला जातो


मुंबई कुणाची, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत राहणाऱ्या सर्वांची आहे. ज्यांनी ज्यांनी मुंबई – महाराष्ट्राला आपले मानले व मुंबईसाठी घाम गाळला त्या सगळ्यांची आहे. मात्र मुंबई सर्वात आधी महाराष्ट्राची आहे. म्हणूनच हिंदुस्थानची आहे, पण नेमक्या याच गोष्टीकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जाते. इतकेच नव्हे तर, मुंबईवरचा मराठी माणसाचा हक्कच नाकारला जातो, असेही ठाकरे यांनी सामनामध्ये म्हटले आहे.


काय म्हणाले होते मुख्यमंत्री?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घाटकोपर स्थानक रस्त्यावरील चौकाचे ‘शिक्षणमहर्षी आय. डी. सिंह चौक’ असे नामकरण बुधवारी  करण्यात आले. प्रामुख्याने उत्तर भारतीयांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमास बोलताना मुख्यमंत्र्यांनी, मुंबईच्या विकासात, मुंबई घडविण्यात उत्तर भारतीयांचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले. ‘मुंबईत मराठी आणि हिंदी भाषिकांच्या संस्कृतींचे उत्तम अभिसरण झाल्याचे आढळते’, असे वक्तव्य केले.