मुंबई : राज्यात शिवसेना विरूद्ध काँग्रेस संघर्ष चांगलाच पेटलाय. काँग्रेसमधल्या गळतीवरून शिवसेनेनं टीकेचे बाण सोडलेत. तर घायाळ झालेल्या काँग्रेसनेही शिवसेनेला इशारा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या महाविकास आघाडीला बिघाडीचं ग्रहण लागलंय. महाविकास आघाडीत शिवसेना विरूद्ध काँग्रेस असा कलगीतुरा चांगलाच रंगलाय. आता तर शिवसेनेनं मुखपत्र सामनातून काँग्रेसवर अत्यंत शेलक्या शब्दात हल्ला चढवलाय. काँग्रेसचा गळती हंगाम नावाच्या अग्रलेखात शिवसेनेनं आपल्याच मित्रपक्षाची सालटी काढलीत.


काँग्रेसमध्ये 'गळती' हंगाम


काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झालीय. ठिगळ तरी कुठं लावायचं? पंजाबमधील काँग्रेस नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षत्याग केलाय. सोनियांपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस उभी करण्याची हाक दिली असताना नव्यानं गळतीला आरंभ व्हावा, हे चिंताजनक आहे. 


ज्योतिरादित्य, जितीन प्रसाद, सुनील जाखड यांनी संकटकाळात काँग्रेस सोडली हे काँग्रेस नेतृत्वाचंही अपयश आहे. तरूणांना पक्षात आपलं भविष्य दिसत नसेल तर कसं व्हायचं? असा सवाल करत शिवसेनेनं काँग्रेसला कानपिचक्या दिल्यात.


सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या काँग्रेसला शिवसेनेची टीका चांगलीच झोंबलीय. आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची धमकीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे. तर यानिमित्तानं भाजपनेही शिवसेनेवर टीकेची संधी साधलीय. 


राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. आतापर्यंत ही तीनचाकी गाडी सुरळीत चाललीय असं चित्र होतं. मात्र निधी वाटपावरून काँग्रेसमध्ये सुरू झालेली धुसफूस आता चांगलीच वाढली आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसनं सुरूवातीपासूनच वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली. त्यामुळं शिवसेनेचाही स्फोट झालाय... हा वाद विकोपाला गेला तर त्याचे गंभीर परिणाम आघाडी सरकारवर होतील, यात शंका नाही.