मुंबई : १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवर शिवसेनेने पंतप्रधानांना चांगला चिमटा काढला आहे. इतकेच नाहीतर अनेक मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. खासकरून काश्मीरच्या आणि जातीच्या मुद्द्यांवरून सेनेने मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या का हल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचला नाही याचेच आश्चर्य वाटते, असा टोलाही सेनेने मोदींना लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल. कश्मीरातील ३७० कलम लगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी कश्मीरात जातील व तेथील लोकांच्या गळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचे आम्ही स्वागत करीत आहोत!, असे सेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटले आहे. 


‘सामना’च्या अग्रलेखातील ठळक मुद्दे : 


- पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केले आहे, पण हे भाषण जगाला उद्देशून केले असावे असेच जास्त वाटते. अनेक मुद्दय़ांना त्यांनी हात घातला आहे व अत्यंत ‘संयमी’ वगैरे पद्धतीने त्यांनी संदेश दिला आहे. नेहमीचे गुद्दे गायब व फक्त मुद्देच मुद्दे असे त्यांच्या भाषणाचे स्वरूप दिसते. आपला देश बुद्धांचा आहे, महात्मा गांधींचा आहे. आस्थेच्या नावावर सुरू असलेल्या हिंसेचे समर्थन करू शकत नसल्याचे मोदी यांनी सांगितले, पण त्यात नवीन काय? हे सर्व काही जुनेच आहे व असेच काही लाल किल्ल्यावरून बोलण्याची परंपरा आहे. 


- देशात हिंसाचार सुरूच आहे व तो श्रद्धा आणि आस्थेच्या नावावर सुरू असेल तर मुसलमानच काय, हिंदूंनाही असुरक्षित असल्याचे वाटू लागेल. हिंदुस्थानात जातीयवाद आणि धर्मांधतेला स्थान राहणार नसल्याची गर्जना पंतप्रधान महोदयांनी केली आहे. जातीयवादाचे विष देशाचे भले करू शकणार नाही हा विचार मोदी यांनी मांडला आहे, पण मुसलमानांची धर्मांधता संपवताना इतर अल्पसंख्याक समाजातील धर्मांधतेचा सैतानही उसळून येणार नाही हे पाहावे लागेल. 


- आज सर्वच जाती आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. मतांसाठी जाती-जातींना चुचकारण्याचे काम आजही वेगाने सुरू आहे. आर्थिक विषमता हेच जातीयवादाचे कारण आहे. ही विषमता पंतप्रधान कशी काय संपवणार? हरयाणा, राजस्थानात जाट व महाराष्ट्रात ‘मराठा’ समाज त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा आर्थिक व सामाजिक विषमतेची दाहकता समजून येते. गोरक्षणाच्या मुद्दय़ावर हिंदू समाजातील काही घटक हिंसक व धर्मांध झाले आहेत आणि त्यांना फक्त इशारे देऊन भागणार नाही. लोकमान्य टिळकांचे फोटो गणेशोत्सवातून हटविण्याचे प्रकार जातीय भावनेतून सुरू झाले असतील तर ही श्रद्धा नसून एक प्रकारची विकृती आहे व राज्यातील मोदी यांच्या शिलेदारांनी ती मोडून काढली पाहिजे. 


- मुंबईसारख्या शहरातील शाकाहार विरुद्ध मांसाहार हा वाद म्हणजे नव्या धर्मांधतेचा उदय आहे. मांसाहार करणाऱ्यांना जागा नाकारणारे बिल्डर हे कोणत्या राजकीय पक्षाचे पोशिंदे आहेत याचा शोध घेतला तर ‘‘श्रद्धेच्या नावावर हिंसाचार व मस्तवालपणा चालणार नाही’’ या पंतप्रधानांच्या भूमिकेस अर्थ उरत नाही. ‘‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही’’ असे मस्तवालपणे म्हणणारे लोक देशात आहेत. नोटाबंदी आणि जीएसटी लागू करताना जो कठोरपणा दाखवला तसा कठोरपणा ‘वंदे मातरम्’च्या बाबतीत का दाखवला जात नाही? ‘‘वंदे मातरम्ची सक्ती सहन करणार नाही’’ असे म्हणणाऱ्या लोकांवर तुमचा धाक नाही किंवा या देशात ‘चलता है’ ही मानसिकता अद्यापि मेलेली नाही. पंतप्रधान म्हणतात,‘‘आम्ही देशाला नवीन ट्रकवर घेऊन जात आहोत.’’ आम्ही त्यांचे स्वागत करतो. 


- मोदी हे शूर आहेतच, मेहनतीदेखील आहेत, पण हा ‘ट्रक’ फक्त अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचाच असू नये. ‘नोटाबंदी’ निर्णयानंतर देशातील काळा पैसा बाहेर आला असेलही, पण आपला वायदा परदेशी बँकांत दडवलेला काळा पैसा बाहेर आणण्याचा होता व सर्व देशवासीयांच्या खात्यात किमान १४ ते १५ लाख रुपये जमा करण्याचा होता. पुढच्या दोन वर्षांत हा वायदा पुरा व्हावा ही लोकांची माफक अपेक्षा आहे व पंतप्रधान ती नक्कीच पूर्ण करतील.