मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच गृहमंत्रिपद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे खाते आपल्याकडेच ठेवावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या मागणीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले आहे. लवकरच राज्य मंत्रिंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी शिवसेनेकडून ही मागणी झाल्याने याची चर्चा सुरु झाली आहे. गृह खात्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, आजपर्यंत मुख्यमंत्र्यांकडेच हे खाते राहिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवण्याचा पॅटर्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही स्वतः कडे गृहखाते ठेवावे. गुन्ह्यांचा Conviction रेट ही वाढला पाहिजे, असे झाले तर सुसूत्रता येईल. मात्र अंतिम निर्णय त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस यांचा असेल असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. दरम्यान, उपमुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे आहे. या नावावर अद्याप एकमत होत नाही. हे पद राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी देण्यासाठी पवार आग्रही आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांना द्यावे, अशी मागणी होते आहे.


दरम्यान, १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर हिवाळी अधिवेशन हे नागपूरला होत आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचे खाते वाटप आणि विस्तार होईल अशी शक्यता आहे. मात्र, अधिवेशनात काही वाद होऊ नये म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करण्याची चर्चाही आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यातही महत्वाच्या खात्यावरुन चढाओढ आहे. त्यामुळे खाते वाटप होण्यास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्येही महत्वाच्या खात्यावर डोळा आहे. त्यामुळे खाते वाटपाचा तिढा, असल्याची चर्चा आहे.