Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी 40 पेक्षा अधिक आमदार फोडून बंडाचा झेंडा फडकवला आहे. जवळपास दोन तृतीयांश आमदार शिंदेंसोबत असल्यानं त्यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. त्यात बंडखोर आमदारांनी समोर येऊन बोलावं, लगेच मुख्यमंत्रिपद सोडतो अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडून मातोश्री गाठली आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले आहेत. शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलनं करत आहेत. आता 92 वर्षांच्या फायर ब्रँड आजीही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"तुम्ही काही काळजी करू नका शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही काळजी घ्या. तो रिक्षावाला होता तो आमदार-खासदार झाला, तुम्ही तुमची तब्येत सांभाळा.", असं 92 वर्षीय आजींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. "कट्टर शिवसैनिक असले तर साहेबांकडे माघारी येतील.. जे गेले ते गेले... ते शिवसैनिक नाहीत... एकनाथ शिंदे माफी मागायाला येतील... उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाणार नाहीत, असंही आजींनी सांगितलं.


कट्टर शिवसैनिक असलेल्या आजींनी यापूर्वी राणा दांपत्याविरोधात आंदोलनात भाग घेतला होता. तेव्हा आजींच्या पुष्पा स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. राणा दांपत्य मातोश्री या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी येणार होते. तेव्हा आंदोलनात चंद्रभागा शिंदे या आजींनी त्या निदर्शनांमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.