मुंबई : सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेला (Shivsena) सध्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेना मंत्री आणि नेत्यांना  ईडी चौकशीचा सामना करावा लागतोय. सध्या शिवसेनेचे तीन मंत्री ईडीच्या (ED) रडारवर आहेत. 100 कोटी वसुलीप्रकरणात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. तर माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यावर सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेत अफरातफरीचे आरोप आहेत. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झालीय. भावना गवळी महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीत परावर्तीत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सईद खान या कंपनी डायरेक्टरला अटक करण्यात आलीय. सईद खानला काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर ही अटक करण्यात आलीय. ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आलीय त्याच कंपनीमध्ये गवळी या निर्देशक होत्या. त्यामुळे भावना गवळी यांच्याभोवती सक्तवसुली संचालनायाचा फास आणखीन घट्ट झाला आहे.


भावना गवळी यांची चौकशी होणार?


सामाजिक कार्यकर्ते हरिश सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. भावना गवळी यांच्या महिला प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप सारडा यांनी केला होता. बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाने नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पण ती कंपनी सुरुच झाली नाही, असा दावा हरिश सारडा यांनी केला आहे. 


किरिट सोमय्या यांचा आरोप


दरम्यान, भाजप नेते किरिट सोमय्या (BJP Kirti Somaiya) यांनी भावना गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखाना खरेदी प्रकरणात मोठा भ्रष्ट्राचार गवळी यांच्या कंपनीने केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसंच भावना गवळी यांनी जनशिक्षण संस्थआ महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयात 7 कोटी रुपयांची चोरी झाल्याची तक्रार केली होती. यावर सोमय्या यांनी भावना गवळी यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली याचा हिशोब द्यावा असं ट्विट केलं होतं. हा महामार्ग बांधकाम कंत्राटदाराकडून आलेल्या वसुलीचा पैसा आहे का? असा सवलाही सोमय्या यांनी उपस्थित केला होता.