कुत्र्याच्या पिल्लाकडे काय लक्ष द्यायचे; रामदास कदमांचा नितेश राणेंवर पलटवार
भुंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत
मुंबई: शिवसेना नेते रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यातील वाद आता चांगलाच तापला आहे. नारायण राणे कोकणाला लागलेला काळा डाग असल्याची टीका शुक्रवारी रामदास कदम यांनी केली होती. यानंतर नारायणे राणे यांचे सुपूत्र नितेश यांनी रामदास कदम यांना थेट 'उद्धव ठाकरेंचा पाळीव कुत्रा', असं म्हटलं होतं. यावरून संतापलेल्या रामदास कदम यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, या पिल्लाच्या प्रश्नांना उत्तर द्यायची मला गरज नाही. त्याचा बाप काही बोलला तर मी प्रत्युत्तर देईन, असे कदम यांनी म्हटले. त्यामुळे शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमधील वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
नारायण राणे हा कोकणाला लागलेला डाग असून हा डाग मी धुतल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका रामदास कदम यांनी शुक्रवारी रत्नागिरीतील कार्यक्रमात केली. यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करून रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. पर्यावरण मंत्री रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांनी पाळलेलं कुत्रं आहे असा टोला नितेश राणेंनी लगावला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना कुत्रे आवडायचे. तसेच राज ठाकरे यांना सुद्धा कुत्रे आवडतात. हीच परंपरा उद्धव ठाकरे यांनी सुरु ठेवली आहे. रामदास कदम सतत भुंकत असतात. पण त्यांना हे माहिती नाही की, भुंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत, अशी बोचरी टीका नितेश यांनी केली होती.