नवी दिल्ली: शिवसेनेने आगामी निवडणूक स्वबळावर लढवणार, असा निर्णय घेऊन मारलेला बाण भाजपच्या भलताच वर्मी लागला आहे. शिवसेनेच्या निर्णयामुळे भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. पटत नसेल तर आमच्या सोबत सत्तेत का राहता? असा संतप्त सवाल भाजपतून विचारला जात आहे. या अस्वस्थ संतप्तेची भाजपच्या सर्वोच्च गोटानेही दखल घेतल्याची सूत्रांची माहिती असून, जर सोबत लढणार नसेल तर, शिवसेनेने सरळ सत्तेतून बाहेर पडावे, असा असा संताप भाजपच्याच ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्याने सूत्रांजवळ व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीवेळी युती तोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन भाजपने बाजी मारली. त्याचा भाजपला फायदाही झाला. त्यावेळी जागावाटपाच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत जोरदार ताणाताणी होती. मात्र, काही झाले तरी, २५ वर्षांची युती तोडून भाजप आपल्यापासून दूर जाणार नाही, असा अतिआत्मविश्वास शिवसेनेला होता. पण, ऐन वेळी भाजपने दणका दिला आणि युती तोडण्याचा निर्णय घेतला. भाजपचा हा निर्णय शिवसेनेच्या चांगलाच वर्मी लागला. आयत्या वेळी शिवसेनेची धावपळ झाली. तेव्हापासून सत्तेत असली तरी शिवसेना भाजपसोबत ताकही फुंकून पिताना दिसत आहे.


दरम्यान, आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवत आणि राज्य आणि देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत शिवसेनेने धनुष्य ताणत बाण मारला. अर्थात, राज्यात आणि देशातही सर्वात मोठा भाऊ ठरलेल्या भाजपलाही शिवसेना असा काही निर्णय घेईल असा अंदाज नव्हता. कारण, बराच काळ आपल्याप्रमाणेच सत्तेतून दूर राहिलेली सेना असा निर्णय घेणार नाही, असा भाजपच्या धुरीनांचा व्होरा होता. मात्र, योग्य वेळ साधत शिवसेनेने विधानसभेचे उट्टे काढण्याचा प्रयत्न केला आहे.


शिवसेनेच्या या निर्णयामुळे येत्या काही दिवसात उभय पक्षात सुरू असलेल्या संघर्षाच्या ठिणग्या ज्वाळा निर्माण करण्याची शक्यता आहे. उभा महाराष्ट्र आणि देश दोन्ही पक्षांचे निवडणुकीच्या सोहळ्यात कसे स्वागत करतो याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.