मुंबई : राज्यात शिवसेना (Shivsena) जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांनी मदत केली होती. मात्र, नारायण राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेलं. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाठिशीही शरद पवार यांचं आशीर्वाद होते, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.


राष्ट्रवादीकडून केसरकर यांना प्रत्युत्तर
दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्त्यांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. 


देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे. उलट शरद पवार यांनी त्यांचा स्वाभिमान, मैत्री जपण्याचे काम केल्याचं महेश तपासे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावी असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही महेश तपासे यांनी दिपक केसरकर यांना करुन दिली आहे.


जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारलं त्यावेळी शरद पवार यांनी शिवसेना - कॉंग्रेस - राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत. शिवसैनिकांची इज्जत आणि स्वाभिमान जपण्याचं काम 2019 मध्ये शरद पवारांनी केलं, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.