मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी फारसे नमते न घेण्याची भूमिका घेतल्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. भाजप हिंदुत्वाची भूमिका आग्रहीपणे मांडणाऱ्यांना अहंकार दाखवत आहे. तर हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांपुढे भाजपने शरणागती पत्कारली आहे. राम मंदिर आणि शबरीमाला मंदिराबाबत भाजपने घेतलेली भूमिका म्हणजे डबल ढोलकी असल्याचे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे दोन मित्रपक्ष नितीशकुमार, रामविलास पासवान यांनी राममंदिरास संपूर्ण विरोध केला आहे. तरीही बिहारात भाजप नेतृत्वाने त्यांच्यापुढे गुडघेच टेकले. राममंदिरासाठी बाजी लावणार्‍या शिवसेनेसमोर अहंकार व रामास विरोध करणार्‍यांपुढे शरणागती. वा रे हिंदुत्व, असे या अग्रलेखात म्हटले आहे. एकूणच अमित शाह यांनी लोकसभेसाठी शिवसेनेशी फार तडजोड न करण्याची भूमिका पक्षनेतृत्वाला चांगलीच झोंबलेली दिसत आहे. 


त्यामुळे शिवसेनेने राम मंदिर आणि शबरीमाला मंदिराबाबत भाजपने घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. या दोन्ही मंदिरांबाबतची भाजप व संघ परिवाराची भूमिका स्वतंत्र म्हणजे मृदंग दोन्ही बाजूने वाजवण्यासारखी आहे. अयोध्येतील राममंदिरप्रश्नी न्यायालयातच काय तो निकाल लागू द्या असे श्री. नरेंद्र मोदी सांगत आहेत व संघाची प्रमुख मंडळी त्यावर थंड प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी दुसर्‍या बाजूस शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश द्यावा या न्यायालयीन निर्णयास भाजप व संघ मानायला तयार नाही. वास्तविक राममंदिरप्रश्नी अध्यादेश काढा व मंदिर बांधा ही लोकभावना आहे. ही लोकभावना मान्य करायला भाजप सरकार तयार नाही, पण शबरीमाला मंदिर प्रकरणात ‘मृदंग’ लोकभावनेस महत्त्व देत आहे, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे.