मुंबई: इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला जाणारे काँग्रेस आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर सध्या चहूबाजुंनी टीका होत आहे. या वादात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. सिद्धूने पाकिस्तानात जाऊन शेण खाल्ले आहे. त्यामुळे त्याच्या राष्ट्रभक्तीच्या ढोंगाचा फुगा फुटला. परंतु, एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पाकिस्तानात जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपच्यादृष्टीने तो मास्टरस्ट्रोक ठरला. त्यामुळे सिद्धूला गुन्हेगार कसे म्हणायचे? हा प्रश्न भाजपवाल्यांना पडला आहे. त्यामुळेच ही जबाबदारी राहुल गांधींवर टाकून भाजप नामनिराळे राहण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका 'सामना'तून करण्यात आली आहे. 
 
  ज्या पाकी लष्करप्रमुखांना नवज्योतसिंग सिद्धू याने मिठी मारली त्याच लष्करप्रमुखांच्या प्रेरणेने कश्मीरात व सीमेवर हिंसाचार सुरू आहे. मी पाकिस्तानात शांततेचा संदेश घेऊन गेलो असे त्याने सांगितले. 
  
पाकिस्तानी लष्करप्रमुखांनीही म्हणे त्यांना शांतता हवी आहे, असे त्याला मिठी मारताना सांगितले, असा या महाशयांचा दावा आहे. सिद्धूला पाकप्रेमाचा एवढाच उमाळा आला असेल तर मग त्याने पाकिस्तानातूनच निवडणूक लढवावी, असेही अग्रलेखात म्हटले आहे. 
 
 सिद्धूने शेण खाल्ले आहेच व त्याबद्दल त्यास जनतेनेच जाब विचारायला हवा. नोटाबंदीस विरोध करणारा, मोदींच्या धोरणांवर टीका करणारा आज देशद्रोही ठरवला जातो. मग पाकिस्तानात जाऊन शेण खाणारासुद्धा देशद्रोहीच, हे सरकारने सांगायला हवे. मोदींनी तसे केले नाही. कारण नवाज शरीफ यांना पाकिस्तानात जाऊन मिठी मारण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनीही केले आहे. त्यांच्यासाठी तो मास्टर स्ट्रोक ठरला. त्यामुळे सिद्धूला कसे गुन्हेगार ठरवायचे? म्हणून मग सिद्धूला गुन्हेगार ठरवायची जबाबदारी राहुल गांधींवर टाकून भाजपवाले मोकळे झाल्याची टीका शिवसेनेने केली.