सध्याच्या काळात शस्त्र उचलली जातात ती पाठीत वार करण्यासाठी- शिवसेना
काही दिवसांपूर्वीच भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, असे वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केले होते.
मुंबई: राज्यातील यंदाच्या निवडणुकीत सत्तेसाठी कोणत्याही थराला जायची राजकीय मंडळींची तयारी आहे. विजयादशमीला पांडवांनी शमीच्या झाडावरील शस्त्र काढली ती धर्म व सत्य यांच्या विजयासाठी. मात्र, सध्याच्या काळात पाठीत वार करण्यासाठीच शस्त्रे उचलली जातात, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सेनेच्या या वक्तव्यामुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर भाजपकडून विश्वासघात होण्याची भीती शिवसेनेला सतावत आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांनी युती केली आहे. मात्र, ही युती करताना जागावाटपात शिवसेनेला अपेक्षित वाटा मिळाला नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीतही ही बाब कबूल केली होती. काही दिवसांपूर्वीच भाजपने मित्रपक्षांना जागा दाखवली, असे वक्तव्यही उद्धव ठाकरे यांनी केले होते. यानंतर आता शिवसेनेने 'सामना'तून पुन्हा एकदा वेगळाच सूर आळवला आहे.
भाजपने रासपशी गद्दारी केली; महादेव जानकरांचा आरोप
या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, सत्ता म्हणजे सर्वस्व अशा वातावरणात निवडणुका होत आहेत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जायची राजकीय मंडळींची तयारी आहे. पांडवांनी शमीच्या झाडावरील शस्त्र काढली ती धर्म व सत्य यांच्या विजयासाठी. आज शस्त्र उचलली जातात ती पाठीत वार करण्यासाठीच. असे असंख्य घाव झेलून शिवसेना उभी आहे. पुढे जात राहील, असे अग्रलेखात म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ता आल्यानंतर भाजप विश्वासघात करेल, अशी भीती शिवसेनेला वाटत असल्याचे दिसून येत आहे.