शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील - संजय राऊत
शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेय.
मुंबई : शिवसेनेचे कडवे हिंदुत्व कायम राहील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेय. राऊत यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. मनसेने झेंडा बदलल्यानंतर त्या पक्षाची भूमिका बदलण्याची शक्यता असताना शिवसेनेला त्याचा फरक पडत नसल्याचे राऊत म्हणाले. अर्थात, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नवे मित्रपक्ष त्यांच्या या भूमिकेकडे कसे बघतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
यावेळी संजय राऊत यांनी मनसेला जोरदार टोला लगावला. वीर सावरकरांनंतर जे हिंदुत्व देशाला अभिप्रेत होते, तो विचार बाळासाहेबांनी रुजवला. काही लोकांना पालवी फुटतेय. ती फुटूंदे, बाळासाहेब आणि शिवसेनेला तोड नाही, असे राऊत यांनी सांगितले. मनसेची हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, त्या अनुषंगाने संजय राऊत यांना काही पक्षांची हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे, असे विचारले असता आपली प्रतिक्रीया दिली.
दरम्यान, त्यांनी काही पक्षांविषयी माहिती नाही, असे सांगत मनसेला चिमटा काढला. शिवसेना आपल्या भूमिकेवर, विचारांवर ठाम आहे. हिंदुत्व हा टक्कर देण्याचा विषय असू शकत नाही, असे राऊत म्हणाले. सत्ता येते जाते. पाय जमिनाीवर ठेवायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले. बाळासाहेब ठाकरे फक्त शिवसेनेचे नाही तर, महाराष्ट्राचे देशाचे दैवत आहे. जगज्जेते कोणत्याही सत्तेवर, पदावर नव्हते. अलेक्झांडर प्रमाणे ते वावरले लोकांना गोळा करुन प्रेरणा दिली आजही शिवसेना त्याच मार्गावरुन पुढे जातेय असे राऊत म्हणाले.