कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : आता खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या सहनशिलतेची परीक्षा सुरू झाली आहे. २५ वर्षे मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेनं भाजपला आपल्यामागे फरफटत नेत दुय्यम वागणूक दिली होती. आता परिस्थिती नेमकी उलटी झाली असून या बदललेल्या परिस्थितीचा फायदा भाजप उचलत आहे. तर शिवसेना नमतं घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमळाबाई म्हणून बाळासाहेबांनी जिची संभावना केली, तीच कमळाबाई आता राज्यात शिवसेनेचा मोठा भाऊ झाली आहे. २०१४ पर्यंत २५ वर्षांच्या युतीत आवाज असायचा तो फक्त शिवसेनेचाच. दिल्लीतून भाजपचा वरिष्ठ नेता आला आणि मातोश्रीवर गेला नाही, असं कधी व्हायचं नाही.  


१९९० ला युतीत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार १९९९ पर्यंत- शिवसेना १७१, आणि भाजपा ११७ जागांवर लढली, २००९ मध्ये - शिवसेना - १६९, भाजपा ११९ जागांवर लढली होती.


पण २०१४ नंतर शिवसेनेच्या नशिबाचे फासे उलटे पडाय़ला सुरुवात झाली. आता भाजपला बदला घ्यायचा आहे. आता भाजपला सूत्र हवं आहे. भाजपसाठी १७१ आणि शिवसेनेसाठी ११७. पण शिवसेना ११७ पर्यंत खाली यायला तयार नाही. शिवसेनेतल्या काही जणांनी ऐकलं असतं तर सत्तेपेक्षा विरोधात बसलो असतो, अशी सल आता शिवसेना नेते बोलून दाखवत आहेत.


सध्याच्या परिस्थितीत जागावाटपात नमतं घेतल्याशिवाय शिवसेनेला पर्याय नाही. त्यामुळंच व्यावहारिक शहाणपण लक्षात घेवून शिवसेना कमी जागा पदरात पाडून युतीसाठी तयार होईल. 


सत्तेपेक्षा विचारांना महत्व देणारी वाजपेयी- अडवाणी यांच्या काळातली युतीची शिकवण ना भाजपमध्ये राहिली, ना शिवसेनेत... आता युतीत फक्त बळी तो कान पिळी अशी स्थिती दिसत आहे.