मुंबई : शिवसेनेचा महत्वाकांक्षी रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकलाय. येत्या महापालिका सभागृहात पुन्हा एकदा रुफ टॉप हॉटेल प्रस्ताव सभागृह मंजूरीसाठी मांडण्यात येईल. 


प्रस्ताव परस्पर मंजूर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रस्ताव याआधी कोणत्याही चर्चेशिवाय आयुक्तांनी परस्पर मंजूर करून टाकला होता. मात्र आता पुन्हा तो सभागृहात आल्यावर त्याला विरोध करण्याचं धोरण विरोधकांनी घेतलंय. रुफ टॉप हॉटेलमुळे मुंबईतील रहिवासी इमारतींना अश्या प्रकारच्या हॉटेलचा त्रास होऊ शकतो तसंच, रात्रीच्या वेळची शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होऊ शकतात, असा दावा करण्यात येतोय. 


याआधीही विरोधकांचा विरोध


दरम्यान, याआधीही सभागृहाचे अधिकार डावलून आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रकार म्हणजे सभागृहाचा अवमान करणारा असल्याचे मत पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटलं होतं. मुंबईतील व्यावसायिक इमारतींच्या गच्चीवर हॉटेल सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव सुधार समितीमध्ये नामंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव पालिका सभागृहात तरी पास व्हावा, यासाठी सत्ताधारी शिवसेना प्रयत्नशील होती. पण बहुमतासाठी संख्याबळाचे गणित जमत नसल्याने अखेर यासंदर्भात नवा मसुदा बनवून तो थेट आयुक्तांकरवी शिवसेनेने मंजूर करवून घेतल्याची टीका करण्यात आली होती.


छतावरील हॉटेल्सला मंजुरी


मुंबईतल्या हॉटेल आणि मॉल इमारतींच्या छतावरील हॉटेल्सला मंजुरी देण्यात आलीय. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिलीय. केवळ व्यावसायिक इमारतींवरच्या छतावरच हॉटेल्स सुरू करता येणार आहेत. मात्र, यासाठी आजूबाजूला १० मीटर अंतरावर रहिवासी इमारत नसणं बंधनकारक असणार आहे. तसंच मॉल आणि लॉजिंग भागातल्या छतावरील हॉटेल्सना परवानगी देण्यात आलीय. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळालाय.