रमजानच्या निमित्ताने आगळीवेगळी इफ्तार पार्टी
मुंबई : रमजानच्या निमित्तानं मुंबईत आगळीवेगळी इफ्तार पार्टी सुरू आहे. भुकेलेल्या अनेक गरीबांची भूक त्यामुळं भागते. रमजान महिना सुरू असल्याने मुंबईत इफ्तार पार्ट्यांची रंगत वाढत आहे. रोझा सोडताना चिकन बिर्यानी, फळे, कबाब आणि मिठाई अशा पदार्थांची रेलचेल असते. मात्र अशा काही पार्ट्यांमध्ये अन्नाची नासाडी होत असते.
इफ्तारी अर्थात रोझाचा उपवास सोडताना अनेक मंडळी ताटात नको तेवढं वाढून घेतात. पण उपवास सोडताना अधिक अन्न खाल्ले जात नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न वाया जातं. वाया जाणारं योग्य ते खाद्यपदार्थ शिववाहतूक सेनेने विविध इफ्तार पार्ट्यांमधून एकत्र केले आणि गरजूंना वाटले आहे.
गेल्या ३ दिवसांपासून हे कार्य सुरू आहे. जमा केलेलं अन्न तासाभराच्या आत गरीब वस्त्यातल्या मुस्लिम कुटुंबांपर्यंत पोहोचवलं जात आहे. अन्नाची नासाडी टाळतानाच रमझानच्या सणात गरीब बांधवांना न विसरण्याचा प्रयत्न केला जातोय. सर्वांना सोबत घेऊन सण साजरा करण्यात एक आगळी वेगळी मजा असते. हा आनंद जेव्हा आपल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर खुलतो तेव्हा खऱ्या अर्थाने रमजान साजरा करण्याचे समाधान लाभते .