दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. शिवेंद्रराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर भेट झाली आहे. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री आणि उदयनराजे भोसले यांची भेट झाल्यानंतर काही वेळातच शिवेंद्रराजे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यातला वाद हा जगजाहीर आहे. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. ही चर्चा सुरु असतानाच शिवेंद्रराजेंनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. याआधी उदयनराजेंचे बंधू आमदार शिवेंद्रराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवेंद्रराजे भाजपमध्ये गेल्यामुळे उदयनराजे अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे.


शिवेंद्रराजे भोसले हे सत्तेसोबत गेले आहेत. सत्तेसोबत असल्यामुळे शिवेंद्रराजे हे सातऱ्यात आणखी मजबूत आणि सक्षम होतील, याची भीती आहे, त्यामुळे उदयनराजे भोसले हे पक्ष बदलण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


पूरग्रस्त भागात मदत कशी करायची याची चर्चा मुख्यमंत्री आणि उदयनराजे यांच्यात होईल. याचबरोबर राजकीय चर्चाही या दोघांमध्ये होईल, असं सांगितलं जात आहे. शिवेंद्रराजेंनी याआधीच पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजप उदयनराजेंनाही पक्षात घेणार का? हा मुद्दा आहे. पण उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडेल, त्यामुळे भाजप ही संधी सोडण्याची शक्यता कमी आहे.


उदयनराजे भोसले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही त्यांनी उदयनराजेंनी त्यांचं स्वत:चं वेगळं अस्तित्व ठेवलं आहे. तसंच आपण पक्ष मानत नसल्याचंही त्यांनी अनेकवेळा सांगितलं.