मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ शिवसैनिकांचा हल्ला
मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला
मुंबई : मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. मातोश्रीजवळ हा हल्ला झाला आहे. शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. आज सकाळपासूनच शिवसैनिक मातोश्री बाहेर पाहारा देत आहेत. नवनीत राणा यांनी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला आहे.
मोहित कंबोज हे मातोश्री बाहेर रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनुचित प्रकार टळला. शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. भाजप नेत्यांनी मात्र या हल्ल्याचा निषेध केला असून सरकारवर टीका केली आहे.
नवाब मलिक प्रकरण, भोंग्याचा वाद अशा वेगवेगळ्या प्रकरणात मोहित कंबोज चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी मंदिरांना मोफत भोंगे वाटपाचा कार्यक्रम सुरु केला होता.
कोण आहे मोहित भारतीय कंबोज?
मोहित कंबोज हे व्यावसायिक असून केबीजे कंपनीचे ते मालक आहेत. सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच ते मुंबई भाजपचे माजी सचिव आणि माजी उपाध्यक्ष ही राहिले आहेत. भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष देखील होते.
2019 साली त्यांची मुंबई भाजपच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
2014 साली ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी त्यांचा पराभव केला होता.