दिपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य यांच्या रुपात ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच कोणीतरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार म्हटल्यावर सर्वत्रच याविषयीच्या चर्चांनी जोर धरला. शिवसेनेसोबतच आदित्य यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे तो म्हणजे त्यांच्या हक्काच्या युवासेनेचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दहा वर्षांमध्ये युवासेनेच्या फळीने चांगलाच जोर धरला. किंबहुना आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी यासाठी युवासेना आग्रही होती. शिवसेनेच्या कर्पोरेट लूकपासून ते बहुभाषिक प्रचारापर्यंत सर्वत्र असणाऱ्या वावरात टीम आदित्य अर्थात काही खास व्यक्तींनी मोलाचं योगदान दिलं. 


गेल्या काही काळापासून चर्चेत असणाऱ्या या टीम आदित्यमध्ये आदित्य ठाकरे यांचे सर्वात जवळचे, विश्वासू म्हणजेच त्यांचे मावस बंधू वरुण सरदेसाई. शिवसेनेचं आयटी सेल, समन्वयक अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. तेसुद्धा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती, पण सध्यातरी ते या कोर कमिटीच्याच कामावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं कळत आहे. 


टीम आदित्यमधील दुसरा चेहरा म्हणजे प्रियांका चतुर्वेदी. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या आणि देश पातळीवरील चेहरा असणाऱ्या चतुर्वेदी यांचं योगदान शिवसेनेच्या जाहिरनाम्यापासून ते अगदी प्रथम ती या विशेष कार्यक्रमांमध्ये त्यांचं मोठं योगदान. माझ्या वाट्याला जी जी जबाबदारी आली, ती मी सांभाळली असंच त्या 'झी २४तास'शी संवाद साधतना म्हणाल्या. 



टीममध्ये युवासेना सचिव सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. आदित्य ठाकरे यांच्या सभा, त्यांच्या भेटीगाठी अशा अनेक कामांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर, साईनाथ दुर्गे, राहुल कनल हेसुद्धा टीम आदित्यचा भाग आहेत. 
आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने सक्रिय झालेली ही युवा फळी पाहता राजकारणात एक नवं पर्व पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या रांगड्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांनी संघटीत बांधणीचं रुप दिलं. आता आदित्य ठाकरे यांच्या निमित्ताने शिवसेना पुन्हा कात टाकत आहे.