भीमज्योतीच्या उद्घाटनावरून भाजप-शिवसेनेत नाराजी नाट्य
शिवसेना-भाजपमध्ये आता श्रेय मिळवण्यासाठी चढाओढ
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई | विधानसभेच्या जागा वाटपाआधीच चैत्यभूमी इथं उभारण्यात आलेल्या भीमज्योतीच्या उद्घाटनावरून भाजप-शिवसेनेमध्ये मानापमान आणि नाराजी नाट्य रंगलं आहे. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या प्रयत्नातून मुंबई महापालिकेने ही भीमज्योत उभारली आहे. कोळंबकर सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांनीच भाजपच्या झेंड्याखाली उद्या १० वाजता या भीमज्योतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठरवला. त्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनाही दिलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोळंबकर यांनी लावलेल्या पोस्टरवर शिवसेनेच्या एकाही नेत्याचा फोटो नाही.
मुख्यमंत्र्यांनीही निमंत्रण स्वीकारलं. मात्र ही भीमज्योत उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने खर्च केला असल्याने कार्यक्रमही मुंबई महापालिका ठरवणार, त्याच्या निमंत्रण पत्रिकाही मुंबई महापालिका छापणार अशी भूमिका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे.
भीमज्योतीचं श्रेय भाजपला घेण्याचा प्रयत्न कोळंबकरांकडून सुरू आहे, तर दुसरीकडे हे श्रेय शिवसेनेला मिळावं असा महापौरांचा प्रयत्न आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांना समजल्यानंतर त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न जाण्याची भूमिका घेतल्याचंही समजतं आहे. त्यामुळे जागा वाटपाआधीच भाजप-शिवसेनेमध्ये मानापमान आणि नाराजी नाट्य रंगलं आहे. दरम्यान रिपाईचे नेते रामदास आठवले याप्रकरणी मध्यस्थी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.