मुंबई : विधानसभेसाठी शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याचीच जोरदार चर्चा राज्यात सुरु आहे. दरम्यान, युतीचे जागावाटप निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप १४४ आणि शिवसेना १२६ जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. तर मित्रपक्षांच्या वाट्याला १८ जागा सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे दिल्लीत आज विधानसभा निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपची तब्बल नऊ तास खलबते झालीत.


भाजपच्या पहिल्या यादीवर आज शिक्कामोर्तब !  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दिल्लीत भाजपच्या उमेदवारांची नाव निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्वाचे नेते मंडळी दाखल झालीत. याच बैठकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे नावे आजच निश्चित केली जाणार आहेत. दरम्यान, त्याआधी ११९ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार होता. त्यापेक्षा जास्त जागा देण्याला अमित शाह यांचा विरोध होता. तर शिवसेनेकडून जास्त जागांची मागणी होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्याचे काम सुरू होते. अखेर यावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. भाजपला १४४  जागा आणि शिवसेनेला १२६ जागा देण्याचे मान्य केल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


युतीमधील ११ पैकी सहा जागांचा प्रश्न नुकताच सुटला होता. मात्र, अद्यापही पाच जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झालेले नाही. त्यामुळे आता या जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समोरासमोर बसून चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. या पाच जागांमध्ये औसा (लातूर), वडाळा (मुंबई), ऐरोली (ठाणे), बेलापूर (ठाणे), उल्हासनगर (ठाणे) या मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे जागा वाटप निश्चित झाले असताना या जागांचा तिढा आता सोडवावा लागणार आहे.