मुंबई: सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षनेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे आता शिवसेनेकडून कान टोचण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून या नेत्यांच्या मर्यादा अधोरेखित करण्यात आल्या आहेत. तसेच राहुल गांधी यांनीही आता लवकर हालचाल कराव्यात अन्यथा भविष्यात पक्षाला गळती लागेल, असा सूचक इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींचा घाव ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी, कपिल सिब्बल म्हणाले...

काँग्रेसमधील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रामुळे दोन दिवसांपूर्वीची काँग्रेस कार्यकारिणीची बैठक वादळी ठरली होती. या नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित केल्याने सोनिया आणि राहुल गांधी नाराज झाले होते. सोनिया गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असेही बैठकीत सांगितले. तर राहुल गांधी यांनीही पत्रावर स्वाक्षऱ्या असणाऱ्या नेत्यांना खडे बोल सुनावले होते. 

शिवसेनेनेही काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रप्रपंचावर शरसंधान साधले आहे. काँग्रेसचे राज्याराज्यांचे वतनदार स्वत:पुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. त्यामुळेच पत्र पुढाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही. काँग्रेस कार्यकारिणीतील वादळ व आधीचे पत्रप्रयोग म्हणजे आडगावाच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला 'एकच प्याला' या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही व पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले. पण नवा प्रयोग नव्या संचात राहुल गांधींनी राजकीय मंचावर आणला नाहीतर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरून नेतील, असे शिवसेनेने म्हटले आहे. 


काँग्रेस पक्ष तुमच्या आणि राहुलजींच्या हातातच सुरक्षित; राजीव सातवांचे सोनियांना पत्र

याशिवाय, अग्रलेखात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मर्यादाही अधोरेखित करण्यात आल्या आहेत. पत्र लिहणारे नेते सत्तरी ओलांडलेले आहेत. देशपातळीवर सोडा पण राज्य किंवा जिल्हापातळीवरही लोकनेता म्हणून त्यांची ओळख नाही. सोनिया गांधी यांच्याकडे सक्रियतेचा आग्रह धरणाऱ्या या नेत्यांना पक्षाला सक्रिय करण्यासाठी कोणी रोखले होते, असा सवालही 'सामना'तून उपस्थित करण्यात आला आहे.