मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका स्टॅण्डअप शोदरम्यान जोशुआने शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अग्रिमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्यावर कारवाईची मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अग्रिमावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलं आहे. तर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनीही याप्रकरणी अग्रिमा जोशुआवर कारवाईची मागणी केली आहे. 


'छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं वक्तव्य करणं अयोग्य आहे. तिला ताबडतोब अटक करण्याची मागणी मी गृहमंत्र्यांना केली आहे. पैसे कमावण्यासाठी जर महाराजांचा वापर करत असशील तर युवती आणि सेना महिला आघाडी तुला सोडणार नाही. तू जिकडे दिसशील तिकडे तुला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. महाराजांबद्दल काही माहिती नसेल, तर शिवभक्तांकडून माहिती करून घे,' असा इशारा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.


'विनोदासाठी छत्रपतींचा उल्लेख करणं, त्यांचा वापर करणं आणि खालच्या पातळीची भाषा वापरणं अत्यंत निंदनीय आहे. याचा धिक्कार आणि निषेध करावा तितका कमीच आहे. या मुलीवर महाराष्ट्र शासनाने आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी. तिच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तिला अटक केली पाहिजे,' अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.