मुंबई : 'जीएसटी' लागू झाल्याबद्दल जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. 'जीएसटी'चा जल्लोष साजरा करणाऱ्यांनो, मिठाई तोंडात भरवणाऱ्यानों जकात नाके गेल्यामुळे पडलेल्या भगदाडांकडे लक्ष देऊन मुंबईची काळजी घ्या अशी मागणी शिवसेना करीत असल्याचं राऊत यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे. हा जल्लोष सुरु असताना मुंबईत एखादा कसाब राजरोस घुसू नये यासाठी शिवसेना सरकारला सावधान करीत असल्याचं ते म्हणाले.


संसदेत शिवसेनेच्या पाठिंब्याने जीएसटी विधेयक मंजूर झाले. मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती बिघडू नये यासाठी शिवसेनेनं आवश्यक त्या सुधारणा या विधेयकात करून घेतल्या. पण जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईचे जकात नाके ओसाड झाले असून सुरक्षा यंत्रणा तिथून हटल्यानं मुंबईस पडलेल्या भगदाडाची शिवसेनेला चिंता वाटत असल्याची भूमिका राऊत यांनी एका प्रसिद्धी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.