मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आढळरावांवर ठपका ठेवण्यात आलाय. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करणारी पोस्ट फेसबुकवर केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो नव्हता. आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. 


एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना समर्थन दिलं आहे. शिवसेनेतून तब्बल 39 आमदार फुटून एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. परिणामी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 


बंडखोर शिवसेना आमदार आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं जात आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.