Aaditya thackeray On Sewri–Nhava Sheva Trans Harbour Link :  मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा या सागरी सेतूसाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. आता यावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. "शिवडी-न्हावाशेवा या सागरी सेतूसाठी 250 रुपये टोल आणि गुजरातकडे जाणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी मोफत जमीन, हा कसला न्याय आहे", असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ते गिरगावातील शिवसेना मेळाव्यात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड तयार होऊन तीन महिने झाले आहेत. मात्र अजूनही उद्घाटनाची वेळ मिळालेली नाही. दिल्लीवरून आदेश नाहीत म्हणून उद्घाटन होत नाहीत. जर 15 जानेवारीपर्यंत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड सुरु केला नाही, तर आम्ही तो सुरु करु, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील प्रकल्प रखडवून ओरबाडण्याचे काम सुरु आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्यापही खड्डे मुक्त झालेला नाही. तर दुसरीकडे महालक्ष्मी रेस-कोर्स बिल्डरांना विकायला निघाले आहेत. तुम्हाला हे मान्य आहे का? आम्ही तिथे एक वीटही रचू देणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्स या भागात आम्ही बिल्डरला घुसू देणार नाही. आता बिल्डरच पालकमंत्री झाले आहेत", असा टोलाही त्यांनी लगावला. 


"हे वर्ष आपल आहे आणि आपलच असणार आहे. त्यामुळे दिल्लीला हे वर्ष आपलच आहे, हे दाखवायचं आहे. ही मुंबई आपलीच राहणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष कायमच दक्षिण मुंबईकडे असतं. कारण हीच दक्षिण मुंबई देशाला चालवत आली आहे. पण खोके सरकार आणि भाजपची हीच पोटदुखी आहे. मुंबईतले कारभार करणारे मोठे उद्योग ऑफिसेस गुजरातला गेले. राज्य सरकार हे महाराष्ट्र विरोधी आहे. सध्या महाराष्ट्रावर फक्त अन्याय सुरू आहे", असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला. 


"गुजरातला देण्याला काही हरकत नाही, पण.."


त्यापुढे ते म्हणाले, "सगळं काही पलीकडच्या राज्याकडे ढकललं जात आहे. गुजरातला देण्याला काही हरकत नाही, पण आमच्या हक्काचं घेऊ नका. एप्रिलमध्ये निवडणुका घेण्याचे चालू आहे. गेल्या दोन वर्षात एफडीआय एक तरी नवा पैसा आला आहे का? एकही नवीन उद्योग आला नाही. वेदांत फॉक्स कॉनमुळे एक लाख रोजगार मिळणार होते पण हाही उद्योग बाहेर गेला. महानंदा ही गुजरातला नेलं.
दूध गुजरातला चाललय, कोल्ड कॉफीमध्ये दूध कसे टाकणार मग ?" असा टोला आदित्य ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना लगावला.


"चाळीस गद्दार बाद होणार म्हणजे होणारच"


"ईडी इन्कम टॅक्स आयटी हे भाजपचे मित्र पक्ष आहेत. सगळे उद्योग आणि चाळीस गद्दार ही गुजरातला गेले. विधानसभा अध्यक्ष  कधी काळी आमचे मित्र होते, राष्ट्रवादीमध्ये होते, आता भाजपमध्ये आणि त्यांचा हा मतदार संघ आहे त्यांना एकच सांगतो की आम्हाला न्याय पाहिजे. ही लढाई एका पक्षाची नाही ही लढाई संविधानाची आहे. संविधानाप्रमाणे हा देश वाटचाल करतोय ते संविधान हे बदलायला निघाले आहेत. चाळीस गद्दार बाद होणार म्हणजे होणारच", असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 


"जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडण लावण्याचे षडयंत्र सुरू आहे. जे कोणी संघर्ष करतात सत्यासाठी बोलतात  त्यावर धाडी टाकतात रोहित पवार यांच्यावर काल धाड पडली. भूतकाळावरती आपल्याला लढवत ठेवले जात आहे. पन्नास शंभर दोनशे वर्षांपूर्वी जे झालं त्याच्यावर वरून आपल्याला लढवल जात आहे, यामुळे नोकरी मिळणार आहेत का ? आपले प्रश्न सुटणार आहेत का ? हे सरकार तुमच्या हिताचा आहे का? हे सरकार सामान्य माणसांचं आहे का?" असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.


"हृदयात राम हाताला काम हे आपलं हिंदुत्व"


"सीएम म्हणजे करप्टमॅन. आपल्या महाराष्ट्र मुंबईच वाटोळं करायला निघाले आहेत. पण येणार सरकार आपला आहे आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते जेल मध्ये जाणार म्हणजे जाणारच. मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आहेत त्यांना सांगतोय सावध राहा. स्ट्रीट फर्निचरचा २६३ कोटीचा घोटाळा केला आहे. सॅनिटरी पॅड, बाथरूम, रस्त्याचा घोटाळा मुंबई महानगरपालिकेत घोटाळे सुरू आहेत. भाजप प्रणित खोके सरकार या सगळ्याला पाठिंबा देत की विरोध करत त्यांनी सांगावे. त्यामुळे संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. या राज्यात हृदयात राम हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे. देश वाचवण्यासाठी प्रत्येकाला कामाला लागलं पाहिजे", असे आवाहनही आदित्य ठाकरेंनी केले.