आज बंडखोर आमदारांची घरवापसी; एकनाथ शिंदे गट मुंबईत येणार, काय असतील सत्तेची गणितं?
आज बंडखोर आमदारांची घरवापसी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात राजकीय बंडखोरी केल्यानंतर गुवाहाटीत जाऊन बसलेल्या आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि त्यांचं तिथलं तळ उचलून ही मंडळी गोव्याच्या दिशेनं निघाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली असणाऱ्या या गटानं बुधवारी रात्री उशीरा गोव्यातील ताज हॉटेल गाठलं.
शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीवरून चार्टड प्लेननं रात्री गोवा विमानतळावर पोहोचले. ज्यानंतर रात्री पावणे बाराच्या सुमारास हा गट हॉटेलमध्ये पोहोचला.
गुवाहाटीतून गोव्यापर्यंतचा प्रवास सुरु असतानाच इथे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि गोव्यात हालचालींना वेग आला. सूत्रांच्या माहितीनुसार आता गोव्यातील हे सर्व आमदार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
शिंदे गट मुंबईत आल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात येणार आहे. यानंरची मोठी घडामेड म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी.
राज्यात नवी सत्ता स्थापन होण्यासाठीचा काऊंटडाऊन आता सुरु झाला आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था मुंबईत बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांना नोटीसही देण्यात आली आहे. आमदारांच्या संरक्षणासाठी 2000 सीआरपीएफ जवान मुंबईत दाखल झाले आहेत.
दरम्यान, सध्या बहुमत चाचणीचा मुद्दा मागे पडला असून, आता पक्षांच्या बैठकींनंतर वाटाघाटी नेमकी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.