अजित पवारच आमचे उपमुख्यमंत्री - संजय राऊत
संजय राऊतांचं सूचक विधान...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणात पूर्णपणे क्लीन चिट मिळाली आहे. अजित पवारांना मिळालेल्या क्लीन चिटनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी, 'अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा आनंद आहे, ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत' असं विधान केलं आहे. संजय राऊत यांच्या या सूचक विधानानंतर अजित पवार पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सिंचन घोटाळ्यातून पूर्णपणे क्लीन चिट मिळाल्यानंतर आता अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचे संकेत आहेत. संजय राऊत यांचा शिवसेनेत, महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत मोठा वाटा आहे. शिवसेनेच्या नेत्याकडूनच अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत आलेल्या विधानानंतर अजित पवारांबाबत स्पष्ट संकेत मिळत आहेत. याआधी दोन वेळा अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. अजित पवारांचा सगळ्या विभागांशी दांडगा संपर्क आहे. याआधी दोन वेळा उपमुख्यमंत्री असल्यानं सरकार कसं चालवायचं याचा अजित पवारांचा अनुभव तगडा आहे.
आता येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी, अजित पवारांबाबत केलेल्या सूचक विधानामुळे, अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री होणार, हे जवळपास निश्चित असल्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी पूर्णपणे क्लीनचीट देण्यात आली. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. सध्या महाविकास आघाडीचं धोरण अजित पवारांना वाचवण्याच्या दृष्टीने पाहायला मिळतं आहे. अजित पवारांविरोधात कुठलाही पुरावा नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची राजकीय वाट सुखर होणार आहे.